Raj Thackeray On Sukh Pahata Marathi Play:महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकारणी आहेत, ज्यांना साहित्याची, कलेची आवड आहे. पण, त्यापैकी फारच थोडे असे आहेत, जे स्वतः कलेची आवड जपत जपतच राजकीय आखाड्यात उतरलेत. त्यापैकी एक नाव म्हणजे, राज ठाकरे. कलेची जाण आणि आवड असणाऱ्या मोजक्या राजकारण्यांमध्ये अगदी आघाडीवर असणारं नाव. राज ठाकरे अनेकदा कलाकारांच्या अडचणींना धावून जातात, तसेच, त्यांच्या कलेला दाद देताना दिसतात. राज ठाकरेंच्या वाचनाची आवडही सर्वश्रुतच. अशातच आता राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करुन काही आठवणींना उजाळा दिला आहे.  

Continues below advertisement

राज ठाकरेंनी मराठी रंगभूमीवरील एक अत्यंत लोकप्रिय, यशस्वी आणि दिग्गज नाटककार वसंत कानेटकर यांच्यासंदर्भातली एक आठवण सांगितली आहे. त्यासोबतच त्यांनी मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे, अशी सदिच्छाही व्यक्त केली आहे. 

'सुख पाहता' नाटकाबद्दल काय म्हणाले राज ठाकरे? 

राज ठाकरेंनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय की, "काही दिवसांपूर्वी माझ्या लायब्ररीत एक पुस्तक शोधत असताना , अचानक 'सुख पाहता' या नाटकाचं एक जुनं पुस्तक सापडलं. वसंत कानेटकरांचं हे नाटक. आजच्या पिढीला कदाचित वसंत कानेटकर माहीत नसतील, पण मराठीत ज्या लेखकांच्या नावावर नाटकांना हाऊसफुलचा बोर्ड लागायचा, अशा लेखकांपैकी एक म्हणजे वसंत कानेटकर. तर हे पुसतक पाहताना पटकन मी भूतकाळात गेलो , कारण याचं मुखपृष्ठ मी केलं होतं!" 

Continues below advertisement

भूतकाळातली आठवण सांगताना राज ठाकरे म्हणाले की, "घडलं असं की, 1989 साली, माझे सासरे, ज्येष्ठ नाट्यनिर्माते श्री. मोहन वाघ हे माझ्या घरी आले आणि म्हणाले की, मी वसंत कानेटकरांचं 'सुख पाहता' नाटक करतोय. त्याचं पुस्तक काढावं अशी कानेटकरांची इच्छा आहे आणि त्यांची अजून एक इच्छा आहे की, त्याचं मुखपृष्ठ तू करावं. मुळात मराठी रंगभूमीचा काय काळ होता की, नाटक हा नाट्यानुभव पण त्याची पुस्तकं पण निघायची आणि लोकं ती आवडीनं विकत घेऊन वाचायची. असो. मी तेव्हा सामना , मार्मिक, लोकसत्ता यांच्यासाठी व्यंगचित्रं करायचो..."

"पण नाटकाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ हे माझ्यासाठी नवीन होतं. मी मोहन वाघांना म्हणलं की, मी नाटक बघतो, आणि सांगतो. माझ्यासाठी एक आनंदाची बाब होती ती म्हणजे, यशवंत दत्त ज्यांचा मी खूप मोठा फॅन होतो, त्यांना प्रत्यक्ष रंगमंचावर बघणार होतो. नाटक शिवाजी मंदिरला होतं. नाटकात यशवंत दत्त यांनी सहा पात्र उभी केली होती, ती पाहून थक्क झालो. घरी आलो आणि मोहन वाघांना कळवलं की, मी करतो मुखपृष्ठ...", असं राज ठाकरे म्हणाले. 

"एका दिवसांत हे मुखपृष्ठ तयार झालं. ते मी मोहन वाघ आणि वसंत कानेटकरांना दाखवलं, ते दोघांना प्रचंड आवडलं. माझ्यासाठी हा तेव्हा मिळालेला आशीर्वाद पण होता आणि मराठी नाट्यसृष्टीतील मानदंड मानल्या जाणाऱ्या व्यक्तींकडून मिळालेली एक पोचपावती पण होती. आज त्या इतिहासाला पुन्हा उजळणी मिळाली. म्हणलं तुम्हाला सगळ्यांना ही आठवण सांगावी आणि हे मुखपृष्ठ दाखवावं...", असं राज ठाकरे म्हणाले. 

"मराठी रंगभूमीवर 'हाऊसफुल'चा बोर्ड कायम झळकत राहू दे आणि नाट्यानुभवसोबतच नाटकाचं पुस्तक घेऊन ते पण झपाटून वाचण्याचा काळ पुन्हा येऊ दे हीच सदिच्छा...", असं राज ठाकरे म्हणाले.