Legendary Tamasha Artist Raghveer Khedekar Awarded Padma Shri 2026: मोठी बातमी. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलीये. पुरस्काराची प्राथमिक यादी जाहीर करण्यात आली असून, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या यादीतील दिग्गज व्यक्तींना पद्म पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या यादीत एकूण ४५ दिग्गजांची नावे आहेत. ज्यात महाराष्ट्रातील काही दिग्गजांच्या नावांचाही समावेश आहे. या यादीत लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर यांच्या नावाचाही समावेश आहे.
लोकनाट्य तमशा क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारतर्फे 2026 चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तमाशा या लोककला प्रकारातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाबद्दल आणि या कलेचे जतन आणि संवर्धन केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. त्यांना पद्म पुरस्कार जाहीर होताच महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचे वर्षाव सुरू झाले आहे.
रघुवीर खेडकर हे ज्येष्ठ तमाशा कलावंत असून, त्यांची ओळख तमाशा क्षेत्रातील एक दिग्गज कलाकार म्हणून आहे. गेल्या चार दशकांपासून रघुवीर खेडकर हे तमाशा रंगभूमीवर कार्यरत आहेत. आई कातांबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेल्या तमाशा ते आजतागायत यशस्वीपणे सांभाळत आहे. तसेच ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्षही आहेत. तमाशा फड मालक आणि कलाकार म्हणूनही त्यांची ख्याती आहे.
रसिकांची सेवा केली, त्याची पोचपावती मिळाली
रघुवीर खेडकर यांना आतापर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार आणि पठ्ठे बापूराव पुरस्कार यांसारखे महत्त्वपूर्ण राज्यस्तरीय सन्मान मिळाले आहेत. दरम्यान, त्यांना नुकताच पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. पद्म पुरस्कार जाहीर होताच रघुवीर खेडकर यांनी एबीपी माझाशी बोलताना आनंद व्यक्त केला. "माझ्या सात पिढ्यांचा उद्धार झालाय. लोकांसाठी, समाजासाठी जे झटलो, त्याची पोचपावती मिळाल्याचा मला आनंद आहे. पद्म पुरस्कार जाहीर होताच माझा आनंद गगनात मावत नव्हता. तमाशा लोककलेला हा पहिलाच पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मला मिळतोय, हे माझं भाग्य आहे. रसिकांची मी सेवा केली, याची पोचपावती मला मिळाली, याचा मला आनंद आहे", असं खेडकर म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
