Anushka Sharma Virat Kohli Premanad Maharaj Movie: ‘हनुमान अंश’ने (Hanuman Ansh) बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला आहे. हा चित्रपट लवकरच 200 कोटींच्या क्लबमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या 35 दिवसांपासून हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये सुरू आहे. रिलीजच्या महिनाभरानंतरही नीम करोली बाबांच्या (Neem Baba Karoli) जीवनाची आणि हनुमानावरील त्यांच्या भक्तीची कथा प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालतेय. दरम्यान, आता आणखी एका संताचं जीवन मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी सुरू झाली आहे. वैष्णव किन्नर आखाड्याच्या जगद्गुरू शंकराचार्य हिमांगी सखी यांनी संत प्रेमानंद महाराजांच्या (Premanand Maharaj) जीवनावर आधारित ‘राधा अंश’ नावाचा चित्रपट बनवण्याची घोषणा केली आहे. ‘राधा अंश’ची बातमी समोर आल्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या लोकप्रिय जोडीच्या सहभागाचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
‘हनुमान अंश’मधून मिळाली प्रेरणा
हिमांगी सखी धार्मिक यात्रेसाठी वृंदावनला पोहोचल्या होत्या. ‘दैनिक भास्कर’शी बोलताना त्यांनी ‘राधा अंश’बद्दल माहिती दिली. नीम करोली बाबांच्या जीवनावर आधारित ‘हनुमान अंश’ या चित्रपटातून आपल्याला प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी सांगितलं. याच प्रेरणेतून संत प्रेमानंद महाराजांचं जीवन आणि त्यांचा आध्यात्मिक प्रवास मोठ्या पडद्यावर आणण्याचा निर्णय घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.हिमांगी सखी यांनी सांगितलं की, त्या लहानपणापासून ब्रजमध्ये राहिल्या आहेत आणि राधाराणीवर त्यांची श्रद्धा आहे.
प्रोडक्शन टीम तयार, मात्र प्रेमानंद महाराजांची मंजुरी बाकी
हिमांगी सखी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या चित्रपटाबाबत प्रोडक्शन टीमशी चर्चा केली असून टीमने चित्रपट बनवण्यास सहमती दर्शवली आहे. मात्र, संत प्रेमानंद महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांची आवश्यक परवानगी अद्याप मिळालेली नाही.हिमांगी सखी लवकरच संत प्रेमानंद महाराजांची भेट घेऊन चित्रपटासाठी परवानगी घेणार आहेत. मंजुरी मिळाल्यानंतर प्रोजेक्टचं काम वेगाने पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.चित्रपटाला मंजुरी मिळताच त्याचा प्रोमो लवकरच तयार केला जाईल, असंही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे परवानगी मिळाल्यानंतर ‘राधा अंश’च्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे.
विराट-अनुष्का सिनेमात दिसणार?
दरम्यान, चित्रपटाच्या कास्टिंगवरूनही चर्चा सुरू झाली आहे. हिमांगी सखी यांनी स्पष्ट केलं की संत प्रेमानंद महाराजांच्या सहकाऱ्यांनी ज्या कलाकारांची शिफारस केली आहे, त्यांनाच कास्ट करण्याचा प्रयत्न केला जाईल. यासोबतच त्या विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्याकडून चित्रपटासाठी मदत आणि सहकार्य मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. यामुळे विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ‘राधा अंश’चा भाग होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. विराट आणि अनुष्का हे दोघेही संत प्रेमानंद महाराजांचं दर्शन घेताना अनेकदा दिसतात. अनेकदा दोघेही वृंदावनला जाऊन त्यांचं आशीर्वाद घेतात. मात्र, विराट कोहली किंवा अनुष्का शर्मा या चित्रपटात सहभागी होणार असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे सध्या त्यांच्या कास्टिंगच्या केवळ चर्चा आहेत.
