मुंबई : कोरोनाची दुसरी लाट बॉलिवूडकरांसाठी चिंतेची गोष्ट झाली आहे. पहिल्या लाटेतून वाचलेल्या अनेक कलाकारांना दुसऱ्या लाटेने मात्र तडाखा दिला आहे. 'थ्री इडियट्स' चित्रपटातील 'रँचो'ला म्हणजेच आमिर खानला कोरोनाची लागण झाल्याचे नुकतेच समोर आले. त्यानंतर आता लगेचत 'थ्री इडियट्स'मधल्या 'फरहान'लाही  म्हणजेच अभिनेता आर. माधवनलाही कोरोनाची लागण झाली आहे. आर. माधवनने त्याला कोरोना झाल्याची माहिती थ्री इडियट सिनेमाच्या माध्यमातून सोशल मीडियावर दिली आहे. त्याची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली असून त्याचे फॅन्स तो लवकर बरा व्हावा अशी प्रार्थना करीत आहेत.

कोरोनामुळे लॉकडाऊन करावा लागल्याने जवळ 8-9 महिने सिनेमाचे शूटिंग बंद होते आणि थिएटर बंद असल्याने सिनेमेही रिलीज होत नव्हते. अनलॉकनंतर बॉलिवूड पुन्हा पूर्वीच्या जोमाने काम करू लागले होते, काही नवे सिनेमेही रिलीज झाले तर अनेक निर्माते, कलाकारांनी त्यांच्या सिनेमाच्या रिलीज डेटही जाहीर केल्या. परंतु आता कोरोना वाढू लागला आहे.

'थ्री इडियट्स' मध्ये आमिर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी यांनी तीन मित्रांच्या भूमिका साकारल्या होत्या. कॉलेज संपल्यानंतर आर. माधवन आणि शर्मन जोशी करीना कपूरसोबत आमिर खानचा शोध घेण्यास बाहेर पडताना दाखवले होते. कॉलेजच्या डीनची भूमिका बोमन इराणी यांनी साकारली होती आणि त्यांना सिनेमात हे तिघेही 'व्हायरस' नावाने बोलावत असत. आर. माधवनने या सगळ्या गोष्टींना जोडून सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 

Pune corona Guidelines | पुण्यासाठी नवीन कोरोना नियमावली; पाहा काय बंद काय सुरू?

माधवनने त्याच्या पोस्टमध्ये म्हटले आहे, 'फरहानला (सिनेमातील आर. माधवनचे नाव) रँचोला फॉलो करायचेच होते आणि व्हायरस नेहमीच आमच्या पाठीमागे लागला होता. त्यावेळी व्हायरसने आम्हाला पकडले नाही पण यावेळी मात्र व्हायरसने आम्हाला पकडले. (यासोबत त्याने हसतानाचा इमोजी टाकला आहे.) परंतु ऑल इज वेल... आणि कोविड लवकरच विहिरीत जाईल. हीच एक अशी जागा आहे जेथे राजू (सिनेमात शर्मन जोशीचे नाव) नसावा असे मला वाटते. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल आभार. माझी तब्येत आता सुधारत आहे.'

आर. माधवनपाठोपाठ मिलिंद सोमणनेही (Milind Soman) त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोशल मिडियावर दिली आहे. मिलिंद सोमणने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, 'कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला क्वॉरंटाईन केले आहे.'

प्रख्यात निर्माते रमेश तौरानी यांनाही कोरोनाची लागण झाली असून यापूर्वी रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन, सिद्धांत चतुर्वेदी, तारा सुतारिया आणि सतीश कौशिक यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर दुसरीकडे कोरोनापासून वाचण्यासाठी धर्मेंद्र, राकेश रोशन, संजय दत्त, सलमान खान, परेश रावल, जितेंद्र, हेमा मालिनी, कमल हसन, नागार्जुन, मोहन लाल, शर्मिला टागोर, अलका याग्निक, सतीश शाह, जॉनी लिव्हर यांनी कोरोनाची लस घेतली आहे.