Pune Yashwantrao Chavan Natyagruha: राज्यातील नाट्यगृहांची दुरावस्था (Poor Condition Of Theaters In The State) आणि तेथील अनागोंदी कारभाराचे अनेक प्रकार यापूर्वी आपण पाहिले आहेत. तसेच, अनेक अभिनेत्यांनी, अभिनेत्रींनी आणि त्यासह नाट्यरसिकांनीही नाट्यगृहांची दुरावस्था, तेथील सोयीसुविधांचा अभाव याबाबत उघडपणे भाष्य केलं आहे. तरीसुद्धा प्रशासनानं याकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारीही अनेक अभिनेत्यांनी केल्यात. याचाच प्रत्यय पुण्यातील कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आलाय. गेल्या शनिवारी (31 मे) प्रेक्षागृहात 'मूषक' नाटकाचा प्रयोग रंगला असताना एक महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदरानं शिरकाव केला. प्रयोग सुरू होण्यापूर्वीही संपूर्ण नाट्यगृहात उंदरांचा उघडपणे वावर दिसत होताच. 

सध्या सोशल मीडियावर पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाबाबतची पोस्ट व्हायरल होत आहे. त्यामध्ये सांगितलंय की, महिला प्रेक्षकाच्या साडीत उंदरानं शिरकाव केल्यामुळे महिलेनं घाबरुन प्रतिक्रिया दिली. पण, नाटकात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या धावतच प्रेक्षकगृहाबाहेर पडल्या. त्यांच्या पतीनंही परिस्थिती संयमानं हाताळली. यामुळे प्रेक्षागृहात फारसा गोंधळ झाला नाही, मात्र बाहेर नेल्यानंतर उंदराला बाहेर काढण्यासाठी जवळपास 20 मिनिटं लागली. सुदैवानं महिलेला तो उंदीर चावला नाही, पण, त्याची नखं मात्र लागली. ही वेळ धावपळ, मानसिक तणाव आणि अस्वस्थतेत गेली, या सर्व प्रकारामुळे पुन्हा एकदा नाट्यगृहांची दुरावस्था समोर आली आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमध्ये काय लिहिलंय? 

'माय रंगभूमी' या इन्स्टाग्राम हँडलनं व्हॉट्सअपवरील माहितीच्या आधारे शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "WhatsApp द्वारे आमच्या निदर्शनास आलेली धक्कादायक घटना तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. रंगभूमी.com या बातमीची पुष्टी करत नाही. सर्वांच्या माहितीसाठी - यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिरातील गंभीर घटना दिनांक 31 मे 2025, यशवंतराव नाट्यमंदिर, कोथरूडमध्ये एक अप्रतिम नाटक सादर होत होतं. मात्र, नाटकादरम्यान एक अतिशय धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार घडला. प्रेक्षकांपैकी एक परिचित महिला, ज्यांनी साडी परिधान केली होती, त्या शांतपणे नाटकाचा आनंद घेत होत्या."

पोस्टमध्ये पुढे म्हटलंय की, "नाटक सुरू होण्यापूर्वी आणि दरम्यान प्रेक्षागृहात उंदीर फिरताना अनेक प्रेक्षकांनी पाहिले होते. मात्र, या प्रकाराची कोणालाही कल्पनाही नव्हती की ही परिस्थिती इतकी गंभीर होऊ शकते. नाट्यप्रेमी असलेल्या या परिचित महिलेच्या साडीमध्ये अचानक एका उंदराने शिरकाव केला आणि त्यांनी स्वाभाविकपणे घाबरून प्रतिक्रिया दिली. आणि नाटकामध्ये व्यत्यय येऊ नये यासाठी त्या धावतच प्रेक्षकगृहा बाहेर गेल्या. त्यांच्या पतीने ही अतिशय कठीण परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळली. आताच्या प्रेक्षागृहात फारसा गोंधळ झाला नाही, मात्र बाहेर नेल्यानंतर उंदराला बाहेर काढण्यासाठी जवळपास 20 मिनिटं लागली. ही वेळ धावपळ, मानसिक तणावात आणि अस्वस्थतेत गेली. नशिबाने तो उंदीर त्या महिलेला चावला नाही, परंतु त्याची धारदार नखे पायाला लागल्यानं इन्फेक्शन टाळण्यासाठी इंजेक्शन घावे लागले."

"ही घटना कुणासोबतही घडू शकते – वृद्ध, लहान मूल किंवा कुठलाही प्रेक्षक. जर एखाद्या ज्येष्ठ नागरिकाच्या बाबतीत असं घडलं असतं, तर कदाचित त्यांचं आरोग्यही धोक्यात आलं असतं. ही अतिशय गंभीर बाब आहे. यशवंतराव नाट्यमंदिराच्या व्यवस्थापनाने त्वरित याची दखल घेऊन उंदरांचा बंदोबस्त करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण सर्वांनी मिळून या प्रकाराची जबाबदारीने दखल घ्यायला हवी. नाट्यगृहात येणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाची सुरक्षितता ही व्यवस्थापनाची प्राथमिक जबाबदारी आहे. प्रेक्षकांनीही नाट्यगृहात खाण्याचे पदार्थ Strictly नेऊ नयेत, कारण त्यामुळेही उंदरांचा शिरकाव होण्याची शक्यता वाढते.", असंही पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे. 

आपण सर्वांनी एकत्र येऊन यशवंतराव नाट्यमंदिर व्यवस्थापनाकडे हे लक्ष वेधून द्यावे, जेणेकरून भविष्यात अशी घटना पुन्हा घडू नये, असं आवाहनही पोस्टमधून करण्यात आलं आहे. कृपया हा संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. आपली सुरक्षितता, आपले नाट्यप्रेम – आपणच जपायचं, असं पोस्टमध्ये लिहिलं आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Suraj Chavan Get Shahir Dada Kondke Award: लय भारी वाटतंय... 'झापुक झुपूक' स्टार सूरज चव्हाणचा स्वर्गीय शाहीर दादा कोंडके पुरस्कारानं सन्मान