Punha Shivajiraje Bhosle Marathi Movie Teaser: 'गर्वाने बोला मी महाराष्ट्रीयन आहे ' असं म्हणत मराठी बाणा जागवणारा 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय ' चित्रपटानं मराठी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं . या चित्रपटाचा घवघवीत यशानंतर तब्बल 16 वर्षांनी या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे . महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) लिखित आणि दिग्दर्शित बहुप्रतिक्षित सिनेमा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले ' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे . 31 ऑक्टोबर रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे . 

Continues below advertisement

पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाचा टिझर

'हमारी सोसायटी मे हम घाटी लोगो को नही रखते ' असं म्हणताना या टीझरची सुरुवात होते .  व्यापारी म्हणून आसरा दिलेल्या परप्रांतीयांच्या अंगातील मुजोरी उतरवणारा आक्रमक मराठा  या चित्रपटातून समोर येणार आहे . पहिल्या भागातून महाराजांचे नेतृत्व दृष्टिकोन एका पिचलेल्या मराठी माणसाला  जागवणारे आणि दिशा देणारे छत्रपती शिवाजी महाराज दिसले होते . ' पुन्हा शिवाजीराजे भोसले ' चित्रपटातून महाराजांचे आक्रमक रूप पाहायला मिळणार आहे .

तगडी स्टारकास्ट, चाहत्यांचा प्रतिसाद

पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता सिद्धार्थ बोडके आहे . छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी लेखक व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका वेगळ्या अभिनेत्याचा विचार केलाय . या सिनेमात विक्रम गायकवाड, शशांक शेंडे, मंगेश देसाई, पृथ्वीक प्रताप, रोहित माने, नित्यश्री अशी कलाकारांची तगडी फौज आहे .

या चित्रपटाच्या टिझरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे . गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रात परप्रांतीयांचा मुद्दा गाजला . आंदोलनं झाली . अशा काळात 'पुन्हा शिवाजीराजे भोसले ' सारखा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे . त्यामुळे मराठी माणसाचा आवाज पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आपली छाप सोडेल अशी आशा आहे . या चित्रपटात अनेक सामाजिक आणि राजकीय मुद्दे समोर येणार आहेत . मुंबईसारख्या शहरात जागेसाठी झगडत असलेल्या मराठी माणसाची कशी गळचेपी होते हे दाखवणारा मुद्दा टिझर मधून समोर आलाय .

धमाकेदार टीझरने प्रेक्षकांना ठेवले खिळवून

'घाटी म्हणजे घाटावर राहणारे . महाराष्ट्र भूमीत स्वराज्याचे रक्षण करणाऱ्या शूरवीरांना अंगाखांद्यावर खेळवणाऱ्या पर्वतरांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी . '  भगवा रंग तुमच्या रक्तातूनच नाही तर धमन्यांमधूनही धावला पाहिजे अशा सगळ्या डायलॉग्जने आतापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे .

या टिझरवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत .एकाने लिहिलंय ,रक्त सळसळतय हा ट्रेलर बघून .सिद्धार्थ सरांची अॅक्टींग जबरदस्त आहे .मानाचा मुजरा या चित्रपटाला .मांजरेकर सर लाजवाब " तर काहींनी "एकच नंबर ..जबरदस्त ", "अशाच सिनेमांची मराठी सिनेसृष्टीला गरज आहे .टिझरच एवढा धमाकेदार असेल तर सिनेमा कसला जबरदस्त असेल याची कल्पना करवत नाही .सिद्धार्थ बोडके च्या अभिनयाला सलाम . हा यावर्षीचा सर्वात मोठा सिनेमा ठरणार .खूप खूप शुभेच्छा ! " अशा प्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत .