Puja Sawant Car Accident: मराठी चित्रपटसृष्टीतील आगामी 'कपबशी' चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक धक्कादायक घटना घडली. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्याहून सांगलीकडे जात असताना 3 गाड्या एकमेकांवर आदळल्या. अपघात झालं त्यावेळी गाडीत अभिनेत्री पूजा सावंत, अभिनेता ऋषी मनोहर आणि चित्रपटाचे प्रसिद्धी प्रमुख दर्शन मुसळे होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून सर्वजण सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील काशीळ परिसरात हा अपघात झाला. महामार्गावर तीन वाहने एकमेकांवर आदळल्याने हा अपघात घडला. अपघातात संबंधित गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी गाडीतील प्रवाशांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. काहींना किरकोळ मुका मार लागल्याचे सांगितले जात आहे.
नेमकं घडलं काय?
'कपबशी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कलाकार आणि चित्रपटाची टीम पुण्याहून सांगलीकडे रवाना झाली होती. याच प्रवासादरम्यान हा अपघात घडला. अपघातानंतर काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, स्थानिकांच्या मदतीने आणि तातडीने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान, पूजा सावंत, ऋषी मनोहर आणि दर्शन मुसळे हे सर्वजण सुरक्षित असल्याने चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
अपघातात कारचे नुकसान झाले असले, तरी वाहनातील सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. काहींना किरकोळ मार लागला असला तरी कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. त्यामुळे एक मोठी दुर्घटना टळली. घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.
कप बशी सिनेमाबद्दल..
वैभव चिंचाळकर यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला 'कप-बशी' हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट 5 जून 202 रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.या चित्रपटात निर्मिती सावंत, पूजा सावंत, ऋषी मनोहर, नयना आपटे, अनंत जोग, राहुल रानडे, विनय येडेकर, चिन्मय शिंत्रे, पूर्णिमा तळवलकर आणि आनंद काळे यांसारख्या दमदार कलाकारांची फळी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे अभिनयाची उत्तम मेजवानी प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
या चित्रपटाची कथा अरुण आणि अरुणा या दाम्पत्याभोवती फिरते. आपल्या मुलासाठी योग्य वधूच्या शोधात असलेले हे दाम्पत्य एका वेगळ्याच अडचणीत अडकते. कारण अरुणाच्या आध्यात्मिक गुरूंनी होणाऱ्या सुनेबाबत काही विशिष्ट निकष घालून दिलेले असतात. त्या निकषांमध्ये बसणारी मुलगी शोधण्याचा अरुणाचा प्रयत्न सुरू असतो. मात्र त्यांना मनासारखी सून मिळते का? गुरूंनी नेमकी कोणती अट घातलेली असते? आणि या सगळ्या अटी-शर्तींच्या गोंधळात मुलाचे लग्न जुळते की नाही? याची रंजक आणि विनोदी मांडणी 'कप-बशी' या चित्रपटात करण्यात आली आहे.
