मुंबई : देशात अनेक राज्यांची लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यु सारख्या पर्यायांचा वापर सुरू केला असला तरी कोरोनाची रुग्णसंख्या काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या तीन लाख 23 हजार 144 नव्या रुग्णांची भर पडली तर 2771 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.या परिस्थितीमध्ये प्रशासनापासून आरोग्य विभागापर्यंत अहोरात्र मेहनत घेणाऱ्या यंत्रणांवरचा ताणही वाढत आहे. अनेक भागांमध्ये आवश्यक सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. भारतातील हे चित्र पाहता अनेक मित्र राष्ट्रांनी देशाच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. याशिवाय काही धनाढ्य व्यक्तीही आता भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. अशा परिस्थितीत अभिनेत्री प्रियांका चोप्रा देखील मदतीसाठी पुढे आली आहे. तिने ट्विटरवरून अमेरिकेच्या राष्ट्रपतींकडे भारताची मदत करण्याची मागणी केली आहे.
देशभरात 1 मे पासून तिसऱ्या टप्प्यातील कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात होत आहे. तिसऱ्या टप्प्यात 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. परंतु वाढत्या संक्रमणामुळे अनेक रुग्णालयात लसींचा तुटवडा निर्माण झाला आहे. प्रियांका आपल्या ट्वीटमध्ये म्हणाली, "भारतातील सद्यस्थिती पाहून मला फार दु:ख होत आहे. अमेरिकेने 550 मिलियन लसींची ऑर्डर केली आहे. जगभरात लस पोहोचवण्यासाठी अॅस्ट्राजेनिकाचे आभार, पण माझा देश आज खूपच बिकट परिस्थितीत आहे. कृपया तुम्ही भारतात लवकरात लवकर लस देऊ शकता का?" प्रियांकाच्या या ट्वीटवर यूजर्सने अनेक प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियांका सोशल मीडियावर सक्रिय असते. प्रियांकाचे या ट्वीटनंतर अनेकांनी तिचे कौतुक केले आहे. सुंदर पिचई यांनी भारतातील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत 135 कोटी रुपयांची मदत करणार आहे.
भारताला संकटकाळात मदत करणार अमेरिका
भारताचे NSA अजित डोवाल आणि अमेरिकेचे NSA जेक सुलिवन यांच्यातील चर्चा यशस्वी ठरताना दिसत आहे. कोरोना लस बनवण्यासाठी कच्च्या मालाच्या निर्यातीवरील बंदीची भूमिका अमेरिकेने मागे घेतली आहे. कोरोना संकटात ज्याप्रकारे भारताने केली तशीच मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असं आश्वासन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडन यांनी दिलं.