Priya Bapat Umesh Kamat Movie Bin Lagnachi Goshta: यंदाच्या आठवड्यात मराठी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी मिळाली आहे. मराठीत एकापेक्षा एक असे दमदार तीन सिनेमे एकाच दिवशी रिलीज करण्यात आले. 'दशावतार' (Dashavtar) , 'आरपार' (Aarpar Marathi Movie) सोबतच प्रिया बापट (Priya Bapat), उमेश कामत (Umesh Kamat) अभिनीत 'बिन लग्नाची गोष्ट' (Bin Lagnachi Goshta) देखील रिलीज करण्यात आला. तब्बल 12 वर्षांनी उमेश आणि प्रियाची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र पाहायला मिळाली. लिव्ह इन रिलेशनशिपच्या पलीकडे नात्यांचं महत्व सांगणारा हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडतोय. याचनिमित्तानं दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना प्रिया बापटनं केलेल्या एका वक्तव्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जर मला एकटीला ऑफर मिळाली असती आणि उमेशला मिळाली नसती तर मी हा सिनेमा केला नसता, असं वक्तव्य प्रिया बापटनं केलं आहे.
'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत प्रिया बापट म्हणाली, "2018 मध्ये मी 'आम्ही दोघी' सिनेमा केला. नंतर मराठी सिनेमा केलाच नाही. फार मोजके सिनेमे माझ्याकडे आले पण ते एवढे चांगले नव्हते. त्यामुळे मला कायम ही खंत राहिली होती की, इतकं सातत्यानं चांगलं काम करुनही इतक्या कमी स्क्रिप्ट्स का येतात? मी खूप बारकाईनं निवड करते किंवा मी हिंदीतच काम करते, असं माझ्याबद्दल पसरलं होतं. पण ते तसं काहीही नव्हतं. 2018 पासून मी हिंदीत काम करायला लागले. पण त्यानंतर आम्ही 'आणि काय हवं' सीरिज केली. मराठी नाटकांची निर्मिती केली आणि आता तर मी मराठी नाटकांत कामही करत आहे. पण आता कोणता तरी मराठी सिनेमा करायचा म्हणून तो करायचा नव्हता. मी असा मार्ग निवडत नाही. योग्य स्क्रिप्टची मी वाट पाहत होते..."
ती पुढे म्हणाली की, "बिन लग्नाची गोष्ट'च्या निमित्तानं तो योग जुळून आला. ही स्क्रिप्ट मला उमेशच्या व्यतिरिक्त जर विचारलं गेलं असतं तर मी केलं नसतं. कारण काही गोष्टींचं अखंडत्व जपायला लागतं. लिव्ह इन रिलेशनशिपमधलं प्रेग्नंट असलेलं जोडपं हे जेव्हा तुम्हाला लोकांना पटवून द्यायचं आहे, तेव्हा तुम्हाला अशी माणसं पाहिजे ज्यांच्या व्यक्तिमत्वाकडे बघून, त्यांची इमेज बघून प्रेक्षक त्या माणसांवर विश्वास ठेवेल. मलाही सिनेमा करताना हे पटत होतं की, हा सिनेमा एक तर वेगळ्या जोडीनं करायला पाहिजे किंवा मग तो आम्हीच, जोडीनं केला पाहिजे. या कथानकासाठी मी कोणा दुसऱ्या अभिनेत्यासोबत किंवा उमेश कोणा दुसऱ्या अभिनेत्रीसोबत असता तर ते वर्क झालं नसतं..."
दरम्यान, नात्यांचा गुंता, प्रेमाची गोडी आणि थोडीशी नोकझोक… हे सगळं सांगणारी प्रिया बापट आणि उमेश कामत यांची 'बिन लग्नाची गोष्ट' 12 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात उमेश आणि प्रियासोबतच निवेदिता सराफ आणि गिरीश ओकसुद्धा दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :