Actress Priya Bakshi Sparks Debate With Viral Rickshaw Incident Clip: बऱ्याचदा सिनेसृ्ष्टीतून अनेक धक्कादायक किस्से समोर येतात. काही अभिनेत्रींसोबत अनेपक्षित घटना घडतात. या घटना ऐकून आपल्यालाही धक्का बसतो. अशीच एक धक्कादायक घटना मॉडेल आणि अभिनेत्री प्रिया बक्षी हिच्यासोबत घडली आहे. प्रियाने अलिकडेच तिच्यासोबत मुंबईत घडलेल्या प्रसंगाबाबत व्हिडिओद्वारे माहिती दिली. तिनं प्रसंग शेअर केला, पण व्हिडिओच्या शेवटी एक ट्विस्ट पाहायला मिळत आहे. तिनं तिचा व्हिडिओ शेअर करुन शेवटी कॅप्शन दिला आहे. कॅप्शनमध्ये तिनं, 'अॅड' आणि 'Collaboration' असे टॅग्स दिले आहेत. यावरुन ही पोस्ट जाहिरातीचा एक भाग असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
'जेएनयू: जहांगीर नॅशनल यूनिव्हर्सिटी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री प्रिया बक्षीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. हा व्हिडिओ तिनं 14 फेब्रुवारी रोजी मुंबईच्या रस्त्यावर चित्रित केला. व्हिडिओमध्ये प्रिया रिक्षात बसलेली दिसत आहे. तसेच ती खूप घाबरलेली दिसत आहे. व्हिडिओत रिक्षा चालकाला अभिनेत्री वाहन थांबवण्यासाठी सांगत आहे. रस्ता अनोळखी वाटत असल्यामुळे ती ओरडते. मात्र, ड्रायव्हर ऐकत नाही. तो म्हणतो, आपण योग्य मार्गावरून जात आहोत. ती संपूर्ण घटना आपल्या कॅमेऱ्यात कैद करते.
ती गुगल मॅपही दाखवते, पण वाहन चालक आपल्या बोलण्यावर ठाम असतो. प्रिया नंतर ओरडतो. 'ऑटो थांबवा, भाऊ.. नाहीतर मी पोलिसांना बोलावते. तुम्ही मला कुठे घेऊन जात आहात? मला तुमच्यासोबत जायचं नाही", यानंतर रिक्षा चालक गाडी थाबंवतो आणि प्रियावर भडकतो. "परत इथे येऊ नका. रस्ता तुम्हाला माहीत नाही. हा आमचा परिसर आहे". यानंतर प्रिया ऑटो बाहेर येते आणि ओरडते. "आम्हा उत्तर भारतीयांना कचऱ्यासारखे वागवले जाते. माझं काम झालं आहे. मी इथे आता वायफळ बडबड करणार नाही. खरंच...", असं म्हणते आणि निघून जाते.
दरम्यान, प्रियासोबत घडलेली ही घटना खरी नसल्याचा अंदाज हॅशटॅगमुळे वर्तवण्यात येत आहे. ही पोस्ट ब्रँड 'कोलॅबोरेशनचा भाग असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओ शेअर करत तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'कधीकधी रस्ता हा खरा मुद्दा नसतो. तर, लोक असतात. शहराशी अपरिचित असल्याने, कुणीही कमी दर्जाचे होत नाही. प्रश्न विचारल्याने कुणीही असभ्य होत नाही. वेगळ्या प्रदेशातून असल्याने कुणीही अनोळखी होत नाही', असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं.
