Indian Idol 3 Winner Prashant Tamang Passes Away: सिनेसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. इंडियन आयडॉल 3 चे विजेते प्रशांत तमांग यांचे निधन झाले आहे. वयाच्या 46 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 11 जानेवारी रोजी त्यांच्या दिल्लीतील राहत्या घरात ते मृतावस्थेत आढळले. ते अलिकडेच पाताल लोक या वेब सिरीजमध्ये दिसले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याची माहिती आहे. परंतु, याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, चित्रपट निर्माते राजेश घटानी आणि प्रशांत तमांग यांचे मित्र अमित पॉल यांनी प्रशांत यांच्या मृत्यूबाबत माहिती दिली. प्रशांत तमांग यांच्या मृत्यूनंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सूत्रांनी दिलेल्या प्रशांत तमांग हे रविवारी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळले. प्रशांत यांच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही. काही रिपोर्ट्सनुसार, त्यांचा मृत्यू ह्रदयविकाराच्या झटक्याने झाले असल्याची शक्यता आहे. दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
11 जानेवारी रोजी प्रशांत तमांग यांना नवी दिल्लीतील द्वारका येथील रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. प्रशांत तमांग हे कोलकता पोलीस दलाचे माजी अधिकारी होते. त्यांनी आतापर्यंत अनेक नेपाळी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अलिकडेच ते पाताल लोक 2 यामध्ये भूमिका साकारली होती. यात त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली असल्याची माहिती आहे. त्यांच्या भूमिकेचं कौतुक करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, अलिकडेच अरूणाचल प्रदेशात लाईव्ह परफॉर्मन्स दिल्यानंतर प्रशांत तमांग अलिकडेच दिल्लीला परतले होते. त्यांनी 30 डिसेंबर रोजी दुबईमध्ये परफॉर्म केला होता. वृत्तानुसार, त्यांना कोणतीही आरोग्य समस्या नव्हती. त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणे दिसून आली नाहीत. दरम्यान, 11 जानेवारीला त्यांचा अचानक ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, प्रशांत तमांग य़ांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ गावी दार्जिलिंगला नेले जावे की, दिल्लीत अंत्यसंस्कार करावेत, यावर सध्या त्यांच्या कुटुंबामध्ये चर्चा सुरू आहे.
प्रशांत तमांग नेमके कोण होते?
प्रशांत तमांग हे मूळचे अरूणाचल प्रदेशातील रहिवासी. प्रशांतचे वडील एका अपघातात वारले होते. ते कोलकाता पोलीस दलात कॉन्स्टेबल होते. वडिलांच्या मृत्यूवेळी प्रशांत हे 8 वर्षांचे होते. वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी कोलकाता पोलीस दलात वडिलांची नोकरी स्वीकारली. घराची जबाबदारी त्यांच्या खाद्यांवर आली. त्या काळात त्यांनी इंडियन आयडल 3 मध्ये सहभाग घेतला. तसेच तो शो जिंकला.