Prashant Damle On CJP Protest: नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचं आंदोलन, सोनम वांगचूक यांचं उपोषण अशा अनेक घडामोडी घडत असताना राजधानीत राजकीय घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वक्तव्यानंतर सरकार चर्चेसाठी पुढे आले आहे. दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ सोनम वांगचुक यांनी केंद्र सरकारकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर 26 दिवसांचे त्यांचे आमरण उपोषण मागे घेतले. कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण लागले होते. त्यानंतर देशभरातून अनेक कलाकार, दिग्गज विद्यार्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आले होते. अनेकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ करत विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. काहींनी विरोध केला. काहींनी मौन बाळगणं पसंत केलं. आता मराठी नाट्यसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी लवकरात लवकर भांडणं संपवा असं म्हणत सरकारसह विद्यार्थ्यांची समजूत काढली आहे. या विषयावर कोणत्याही एका बाजूची निवड करणं त्यांनी टाळलं असलं तरी तीन महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला. त्यांच्या व्हिडिओची सध्या चर्चा आहे.
काय म्हणाले प्रशांत दामले?
' नमस्कार मंडळी, काय आहे, तुम्ही जशी आजुबाजूची परिस्थिती बघतायात, तशी मीही बोलतोय बरं का. अनेक जणांनी मला सांगितलं की, प्रशांत भाऊ तुम्ही काहीतरी व्यक्त व्हायला पाहिजे. खरं म्हणजे, मला भांडायला आवडत नाही. मला मारामारी करायला आवडत नाही. पण, आता परिस्थितीच अशी आहे की व्यक्त होणं गरजेचं आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे, कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होता कामा नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणाच्याही जीवाची हानी होता कामा नये. तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट अशीय की - भांडणं ही तात्पुरती असतात, उद्या आपल्याला पुन्हा एकमेकांना भेटायचंय. गप्पा मारायच्यात . दिवाळी साजरी करायचीय. गणपती साजरा करायचंय. या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र करायच्यात. माझी विनंती आहे, भांडणं थांबवा. आता सरकारनं हात पुढे केलाय. तुम्ही तुमचा हात त्यांच्या हातात द्या. आणि विषय संपवा. विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. बरोबर की नाही? आपला देश आता पुढे यांच्या हातात आहे. त्यांना वाचवणं, त्यांना शिकवणं हे फार महत्त्वाचंय. त्यामुळे लवकरात लवकर हे मतभेद संपवून टाका. चर्चा करा. संवादाने अनेक गोष्टी मोकळ्या होतात. सुटतात. लवकरात लवकर भांडणं संपवा ही सगळ्यांना नम्र विनंती.' असं ते म्हणाले आहेत.
