Prashant Damle on NEET Protest: नीट पेपरफुटीवरून देशभरातील विद्यार्थी दिल्लीतील जंतरमंतर येथे काही दिवसांपूर्वी एकवटले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी छेडलेल्या या आंदोलनानंतर देशातील शिक्षण व्यवस्थेवरून सरकार विरोधाचा सूर तिक्ष्ण झाला. या आंदोलनाच्या समर्थनार्थ देशभरातील 'जेन झी' तरुणाई रस्त्यावर उतरली. दरम्यान मनोरंजनसृष्टीतील अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला. तर अनेकांनी सरकारच्या बाजूचा मार्ग निवडला. सोशल मीडियावर अनेकांच्या पोस्ट व्हायरल झाल्या. दरम्यान, मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गज अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी' जर नीटचा फुल फॉर्म माहीत नसेल, तर आंदोलनात जाऊन उपयोग काय?' असा सवाल केला. 'माझा कट्ट्यावर ते बोलत होते. त्यांचं हे वक्तव्य सध्या चर्चेत असून अनेकजण त्यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत आहेत.
आंदोलन सुरू होतं त्यावेळीही अभिनेते प्रशांत दामले यांनी व्हिडिओ करत या विषयावर आपलं मत व्यक्त केलं होतं. 'सरकारने हात पुढे केला आहे, आता तुम्हीही त्यांच्या हातात हात द्या' अशा आशयाचं ते बोलले होते. Abp माझाशी बोलताना, जेन झींचं आंदोलन, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा या विषयावर ते बोलले आहेत.
काय म्हणाले प्रशांत दामले?
'हा योगायोग आहे.मी आवाहन केलं आणि त्यांनी राजीनामा दिला असं होत नाही , असं होऊही नये. तरुणांचे प्रश्न वेगळे असतात.त्यांची इच्छा वेगळी असते. त्यांचा ऐकून घेणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या म्हणण्याला योग्य वेळी उत्तर देणे महत्त्वाचं आहे. हल्ली त्यांना सगळं झटपट पाहिजे. मी तुला सांगितलं आणि तू परत दोन दिवसांनी फोन करून सांगशील, असं त्यांना चालत नाही. तिथल्या तिथे त्यांना उत्तर पाहिजे. कारण ते आपल्यापेक्षा फास्ट आहेत. त्यांच्याकडे तशी साधनं आहेत. काही वेळा अर्धवट माहितीवरसुद्धा ते त्यांची गाडी ढकलतात. मला असं वाटतं की, 50 पैकी 40 लोक अर्धवट माहितीवर गाडी ढकलणाऱ्या असतात. दहाजण काम करणारे असतात, किंवा अभ्यासपूर्ण बोलणारे असतात. मला असं वाटतं की, 10 जण कोण आहेत, हे ओळखायला पाहिजे. फक्त सरकारच नाही, तर कुठल्याही क्षेत्रात. जे अभ्यास करून बोलतात, ते खरे असतात. त्यांची मतं काय आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे.' असं अभिनेते प्रशांत दामले म्हणाले.
'नीटचा फुलफॉर्म माहित नसेल तर घोषणा देऊन काय उपयोग?'
ते पुढे म्हणाले 'आताच्या मुलांना खूप जास्त स्वातंत्र्य आहे. ते इतकं पण नको. स्वातंत्र्य म्हणण्याआधी मी त्यांच्यापेक्षा हुशार पाहिजे, तर मी हे म्हणू शकतो की, त्यांना स्वातंत्र्य नको. त्यांनी एखादा काउंटर केला तर त्यावर मला काउंटर करता आलं पाहिजे. 50 पैकी 10 मुलं अतिशय हुशार आहेत, पण 40 मुलं अर्धवट अभ्यास करणारे आहेत. तर अर्धवट अभ्यास करणाऱ्या मुलांबद्दल मी बोलतोय. ही जी अर्धवट अभ्यास करतात ना ..समजा नीटचा फुल फॉर्म काय हे जर आपल्याला माहित नसेल, तर नीट च्या घोषणा देऊन काय उपयोग? ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत, यासाठी मी इथे आलोय, ती गोष्ट तुम्हाला करायची असेल, तर त्याची तुम्हाला पूर्ण माहिती असणं, त्यातले फायदे तोटे, येणारे अडथळे कळणं आवश्यक आहे.'
'मी 44 वर्षे इथे काम करतोय.इथे काय अडथळे येऊ शकतात याची मला माहिती आहे.1983 ते 2008 मध्ये मी फक्त कलाकार होतो.या संपूर्ण कालावधीत निर्मात्याला येणाऱ्या अडचणी काय असू शकतात हे मी शिकलो.अर्धवट माहितीच्या आधारे कोणावरही आरोप करणं चुकीचं आहे असं मला वाटतं' असं प्रशांत दामले म्हणाले.
