Prasad Vedpathak White Line Controversy: सध्या घाटकोपरमधल्या (Ghatkopar) 'कैलास अवेन्यू' सोसायटीमध्ये मारण्यात आलेल्या पांढऱ्या पट्टीचा वाद चिघळला आहे. युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक (Social Media Influencer Prasad Vedpathak) यानं हा मुद्दा उचलून धरला. त्यानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला, जो सध्या जोरदार व्हायरल होतोय. मुंबईतील (Mumbai News) विद्याविहार इथल्या ज्या सोसायटीमध्ये प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) राहतो, त्या सोसायटीच्या आवारात कुणाच्याही परवानगीशिवाय काही सदस्यांनी परस्पर निर्णय घेऊन पांढरी पट्टी मारली, त्यावरुनच मोठा वाद निर्माण झाला.
जैन धर्मगुरूंसाठी इमारतीच्या आवारात पांढरी पट्टी (White Strip To Welcome Jain Religious Leaders) मारली आहे, असा दावा इन्फ्लुएन्सरनं केलाय. NDTV शी बातचित करताना प्रसाद वेदपाठकनं या प्रकरणी एक इशाराही दिला आहे. मला जर यासाठी धरणे आंदोलन करावं लागलं, तर मी तिथे खाली मांडी घालून बसीन, मग मी तिथे काहीही खाईन... मला जे आवडतंय ते... मी रोज नॉनव्हेज खातो... काही करीन मग, बघून घ्या बाबा..., असं प्रसाद वेदपाठक म्हणाला आहे.
युट्यूबर, इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक नेमकं काय म्हणाला? (Influencer Prasad Vedpathak White Line Controversy)
युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं आता थेट इशाराच दिला आहे. इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक म्हणाला की, "आमचा व्यावसाय आहे की, आम्ही सोशल मीडियावर व्हिडीओ बनवतो... आम्ही कंटेन्ट क्रिएट करतो. आमचे जेवढे पेज आहेत, त्यावर जैन कम्युनिटेचे काही एलिमेन्ट्स मास रिपोर्टिंग करतायत, ते असा प्रयत्न करतायत की, ते पेज डिलिट झाले पाहिजेत, सस्पेन्ड झाले पाहिजेत... मी फक्त विचारलेलं की, ही पट्टी जी तुम्ही मारलीय, त्याचं लॉजिक काय? हा प्रश्न होता माझा, ही करूणा, हे प्रेम... तुम्ही पहिली कानाखाली मारली माझ्या, खाली जी पट्टी दिसतेय ती, कानाखाली आहे माझ्या... आणि नंतर तुम्ही 'मिच्छामि दुक्कडम्' म्हणणार? अरे हा काय प्रकार आहे? त्याऐवजी सरळ तोंडावर येऊन कानाखाली मारा... हा दुतोंडी प्रकार मला नाही आवडलाय..."
"आमच्याशी बोलताना त्यांची दोन उत्तरं होती... आधी म्हणाले, ठीक आहे आम्ही हे काढून टाकतो... नंतर म्हणाले, चारच महिन्यांसाठी आहे, आमचे संत येऊन जाऊ देत, मग काढतो... म्हणजे, हेच कन्फ्युज आहेत. त्यांना काय करायचंय माहीत नाहीये... त्यात ते हेसुद्धा म्हणतायत की, कमिटीला पाहू देत, कमिटी जो काही निर्णय घेईल, ते केलं जाईल... हे खरंच खूप निराशाजनक आहे... एक भूमिपुत्र आहे मी इथला. चौथी पिढी आहे माझी इथली... माझी आज्जी नसती तर, ही बिल्डिंग उभी राहिली नसती, यांनी फ्लॅट्स नसते घेतले इथे... आणि मलाच हे भोगावं लागतंय... इथे खाली आमचं मंदीर आहे. ज्यावर संपूर्ण मालकी हक्क अजून आमचा आहे, मी जाऊन त्याला टाळं लावू शकतो आणि असाच तेढ निर्माण करू शकतो... पण, तसं शिकवलं नाहीय आम्हाला...", असं प्रसाद वेदपाठक म्हणाला आहे.
पुढे बोलताना प्रसाद वेदपाठक म्हणाला की, "मी घेतलेल्या भूमिकेसाठी मला फक्त मराठी समाज नाहीतर, जैन समाजाकडूनही पाठींबा मिळतोय. त्यांचंही असं म्हणणं आहे की, बळजबरीनं अशी एखादी गोष्ट करणं योग्य नाही. ज्या साध्वी असतात, त्यांनी त्याग केलेला असतो... त्यामुळे त्याग आणि VIP ट्रिटमेंट या खूपच विरुद्ध गोष्टी आहेत. त्या कधीच अशा VIP ट्रिटमेंट मागत नाहीत. प्रत्येक माणूस वेगळा असतो, प्रत्येकात काहीतरी कमी असतं... त्यामुळे अशाच व्यक्तीच्या मनातून आलेली ही कूटनिती आहे. हे तातडीनं थांबवलं पाहिजे. पब्लिक प्रॉपर्टीमध्ये, फुटपाथवरही अशा गोष्टी सुरूयेत. त्यामुळे सरकारकडेही माझी मागणी आहे की, काल रात्री मी बाईक चालवताना स्पीड ब्रेकर मला दिसला नाही. माझा अपघात होता-होता राहिलाय. तिकडे पांढऱ्या पट्ट्या मारा, अशा फुटपाथवर व्हाईट पट्ट्या नका मारू..."
"35 वर्ष आम्ही घाटकोपरमध्ये राहतोय, पण इथे कधीच आम्ही अशा पांढऱ्या पट्ट्या त्या फुटपाथवर पाहिलेल्या नव्हत्या, त्या फुटपाथवर आल्यानंतर त्या आमच्या बिल्डिंगमध्ये आल्यात. पहिल्यांदा घडतंय हे... ते आता म्हणतायत आता, आपण काढू ती पट्टी... पुन्हा नाही करणार... प्रश्न हाच आहे की, कधी काढणार...? मला जर यासाठी धरणे आंदोलन करावं लागलं, तर मी तिथे खाली मांडी घालून बसीन, मग मी तिथे काहीही खाईन... मला जे आवडतंय ते... मी रोज नॉनव्हेज खातो... काही करीन मग, बघून घ्या बाबा...", असं प्रसाद वेदपाठक म्हणाला आहे.
प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीतला पांढऱ्या पट्टीचा वाद नेमका काय?
प्रसाद वेदपाठक याच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी ही पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली आहे. यावर प्रसाद वेदपाठक यानं प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी आपली परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावाही प्रसाद वेदपाठक यानं केला आहे. प्रसाद वेदपाठक यानं दिलेल्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला आहे. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही प्रसाद वेदपाठक यानं केलेली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
ABP Majha च्या बातम्या LIVE:
