मुंबई : सोशल मीडियावर गेल्या आठवडारापासून युट्यूबर प्रसाद वेदपाठकने (Prasad vedpathak) उचलून धरलेला वादाचा मुद्दा चांगलाच गाजत असून घाटकोपरमधल्या (Mumbai) सोसायटीचा हा वाद आहे. सोशल मीडियावर या वादावरुन वेगवेगळ्या चर्चा रंगल्याचं पाहायला मिळतंय. आपण राहत असलेल्या सोसायटीतील घटनेवर प्रसादनं संताप व्यक्त करत तीव्र नाराजी व्यक्त केलीय, त्याच्या या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली होती. कारण, सोसायटीमधील जैन कुटुंबीयांनी सोसायटीत कुणालाही न विचारता पांढरी पट्टी मारली होती. या पांढऱ्या पट्टीला सोयायटीमधील इतर सदस्यांनीही विरोध दर्शवला होता. माध्यमांनीही हा मुद्दा उचलून धरला होता. अखेर, आता ह्या पांढऱ्या पट्टीवर रंगकाम करण्यात आलं असून स्वत: प्रसादने याची माहिती दिली आहे.
प्रसाद वेदपाठकच्या सोसायटीत काही जैन समाजातील लोकांनी पांढऱ्या रंगाची पट्टी मारल्याची माहिती समोर आली. त्यावर प्रसादने प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, आपल्या सोसायटीच्या आवारात अशी पांढरी पट्टी मारण्यात आली, त्यावेळी सोसायटीतील सदस्यांची परवानगी कुणीच घेतलेली नाही, असा दावा त्याने केला आहे. प्रसादच्या माहितीनुसार, जैन धर्मगुरूंसाठी ही पट्टी आखण्यात आली आहे. धार्मिक मान्यता पाळायच्या असतील तर त्या घरी कराव्यात सार्वजनिक ठिकाणी असं प्रकारच्या कृत्यावर प्रसादनं आक्षेप नोंदवला होता. तसेच, हा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, त्यामळे ही पट्टी लवकरात लवकर हटवावी, अशी मागणीही त्याने केली होती. अखेर, प्रसादने ट्विटवरुन घटनेची माहिती देत, पांढऱ्या पट्ट्यांवर रंगकाम सुरू करण्यात आल्याचे सांगितले, त्याने फोटोही शेअर केला आहे. तसेच, माध्यमांनी दखल घेतल्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले.
मला हे सांगताना आनंद होत आहे की, सोसायटीमधील संवाद आणि परस्पर सहकार्याच्या माध्यमातून हा वाद आता निकाली निघाला आहे. मतभेदाचे केंद्रबिंदू असलेली पांढरी पट्टी काढून टाकण्यात आली आहे आणि संबंधित जागा पूर्ववत करुन पुन्हा रंगविण्यात आली. त्यामुळे या प्रकरणावर समाधानकारक तोडगा निघाल्याचे प्रसाद वेदपाठकने आपल्या ट्विटरवरुन सांगितलं आहे. माध्यमांनी या घटनेचे वृत्तांकन करत महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. मात्र, पुढील वृत्तांकनासाठी आमच्या गृहनिर्माण सोसायटीला भेट देणे टाळावे, असेही त्याने म्हटले आहे. जवळपास गेल्या आठवडाभरापासून सोसायटीतील रहिवाशांना वारंवार होणाऱ्या भेटी, मुलाखती आणि परिसरातील माध्यमांच्या हालचालींमुळे सतत व्यत्ययाचा सामना करावा लागत आहे. वृत्तांकनाबद्दल आम्ही कृतज्ञ असलो तरी आता सर्व रहिवाशांचे दैनंदिन जीवन पूर्ववत होणे आवश्यक आहे, असे त्याने म्हटलं आहे.
माझ्यासाठी हा प्रश्न संपला
एखादा वाद शांत आणि सदनशीरमार्गाने पद्धतीने सोडवल्यानंतर योग्यवेळी प्रश्न मार्गी लागून पुढे जाणेही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळेच, गृहसोसायटी सुरळीत कार्यरत राहण्यासाठी मी हा विषय पूर्णपणे संपल्याचे मानतो. माध्यमांच्या सहकार्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो, असेही प्रसादने म्हटले आहे.
