Prasad Vedpathak White Line Controversy: सोसायटीमधील जैनांच्या पांढऱ्या पट्टीविरोधात आवाज उठवला, प्रसाद वेदपाठकला धमक्यांचे फोन, पोलीस संरक्षणाची मागणी
Prasad Vedpathak White Line Controversy: मुंबईतील विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी आखण्यात आलेल्या सफेद पट्टीवरून वाद निर्माण झाला आहे.

Prasad Vedpathak White Line Controversy: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (Social Media Influencer), युट्यूबर (YouTuber) प्रसाद वेदपाठक (Prasad Vedpathak) सध्या चर्चेत आला आहे, त्यानं शेअर केलेल्या एका व्हिडीओमुळे सध्या जोरदार चर्चा सुरू आहेत. मुंबईतील (Mumbai News) विद्याविहार इथल्या ज्या सोसायटीमध्ये प्रसाद वेदपाठक राहतो, त्या सोसायटीच्या आवारातल्या पांढऱ्या पट्टीवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. सोसायटी कमिटीमधील काही सदस्यांनी इमारतीतील रहिवाशांना कल्पना न देताच, त्यांची कोणतीही परवानगी न घेताच, जैन धर्मगुरूंसाठी इमारतीच्या आवारात पांढरी पट्टी (White Strip To Welcome Jain Religious Leaders) मारली आहे, असा दावा इन्फ्लुएन्सरनं केलाय. अशातच आता प्रसाद वेदपाठक यानं पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. त्यामुळे आता विद्याविहारच्या सोसायटीतील पांढऱ्या पट्टीचा हा वाद आणखी चिघळणार असल्याचं बोललं जातंय.
मुंबईतील विद्याविहार येथील कैलास अव्हेन्यू सोसायटीमध्ये जैन धर्मगुरूंसाठी आखण्यात आलेल्या सफेद पट्टीवरून वाद निर्माण झाला आहे. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं सोसायटीनं सभासदांची परवानगी न घेता ही पट्टी आखल्याचा आरोप करत सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलीस त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले असून तपास सुरू आहे. तसेच,इमारतीतील काही व्यक्तींकडून धमक्या मिळत असल्याचा आरोप प्रसाद वेदपाठक यानं केला असून पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.
प्रसाद वेदपाठक शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये नेमकं काय म्हणाला?
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर प्रसाद वेदपाठक यानं त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रसाद वेदपाठकनं सोसायटीच्या आवारात काढलेल्या पांढऱ्या पट्टीवरुन नाराजी व्यक्त केली आहे. प्रसाद वेदपाठक यानं म्हटलंय की, सोसायटी कमिटीमधील काही जैन सदस्यांनी एकतर्फी निर्णय घेऊन परमनंट पांढरी पट्टी इमारतीच्या आवारात मारली आहे. जी सामायिक जागेचा (Common Space) गैरवापर करणारी आहे. त्यानं यामागील लॉजिकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटलंय की, जर आज अशी पांढरी पट्टी मारली, तर उद्या कोणीही इतर रंगांच्या पट्ट्या मारेल, धार्मिक मान्यता पाळायच्या असल्यास साधुसंतांना खांद्यावर घेऊन घरी न्यावं, पण असे प्रकार करू नयेत. या प्रकारामुळे मानसिक मनस्ताप झाला असून, सर्व रहिवाशांची माफी मागावी आणि ही पांढरी पट्टी तातडीनं काढावी, अशी मागणी त्यानं केली आहे.
माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रसाद वेदपाठक यानं म्हटलंय की, "आतापर्यंत ऐकलेलं हिंदू खतरे में हैं... कुणापासून खतरा हैं हे माहीत नव्हतं... आज कळलंय हा खतरा आम्हाला कुणापासून आहे. आम्ही इथले मूळ रहिवाशी, माझ्या आज्जीनं ही बिल्डिंग डेव्हलप केलीय. माझ्या पणजोबांनी ही जागा विकत घेतलेली आणि आज ही पांढरी पट्टी इथे मारली, तेव्हा आम्हाला विचारलंसुद्धा नाही... फार वाईट वाटतंय, आता रोज ही पट्टी आम्हाला पाहावी लागणार आहे, डोळ्यांत खुपणार आहे, आपली औकात नक्की काय आहे इथे? मुंबईत, या मातीवर... भूमीपुत्र आहोत आपण... इथे आपली औकात काय? फार लागतंय... म्हणजे, जर मी इथे गोंधळ घातला, बोकड कापला... इकडे मी कोंबड्या कापल्या तर चालेल का? किंवा एखाद्या मुस्लिम बांधवानं 'अल्ला हू अकबर' लिहिलं असतं, तर चाललं असतं का? हा प्रश्न आहे..."
जैन धर्मगुरू नेहमी येतात, आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण ही पट्टी पहिल्यांदाच आलीय : प्रसाद वेदपाठक
"गेल्या 25 वर्षांपासून ही बिल्डिंग इथे उभी आहे. जैन धर्मगुरू नेहमी येतात, आम्ही त्यांचा खूप आदर करतो, पण ही पट्टी पहिल्यांदाच आलीय. या पट्ट्या घाटकोपरमधल्या फुटपाथवर तुम्हाला पाहायला मिळतील. तोसुद्धा एक विषयच आहे की, ते सगळं कोणत्या फंडातून केलं जातंय. पण आज ती पट्टी धावत धावत आमच्या बिल्डिंगमध्ये, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये आलीय. ही फार धोक्याची गोष्ट आहे, प्रत्येक मराठी रहिवाशांनी, मूळ स्थानिकांनी, भूमीपुत्रांनी या गोष्टीची नोंद केली पाहिजे, यामागचं राजकारण समजून घेतलं पाहिजे...", असं प्रसाद वेदपाठक म्हणालाय.
"बरेच आमच्यासारखे रहिवाशी असतील, प्रत्येकात हिंमत होत नाही की, आपण बहुमताच्या विरोधात जाऊन बोलावं, मी ती हिंमत दाखवलीय, मला असं वाटतं की, भारतात तुम्ही फोर्सफुली एकरुपता नाही आणू शकत, एकतेची गरज आहे. त्यासाठी सर्वांची समंती लागले, सर्वांना मानसन्मान द्यावा लागतो. कुणालाही गृहीत धरून, जबरदस्तीनं असं नाही करू शकत. माझं एवढंच म्हणणं आहे की, प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये जर आम्ही राहतो, तर एकदा तरी विचारा...", असं मत प्रसाद वेदपाठक यांनी व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :






















