Bigg Boss Marathi 6: ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या पर्वाला जोरदार सुरुवात झाली असून, रविवारी 11 डिसेंबर रोजी शोचा भव्य ग्रँड प्रीमियर पार पडला. यंदाच्या सीझनमध्ये सोशल मीडिया, टीव्ही, सिनेमा आणि विविध क्षेत्रांतील ओळखीचे चेहरे घरात दाखल झाले आहेत. त्यापैकी सोशल मीडियावरील व्हायरल 'सोनवणे वहिनी' व्हिडीओंमुळे लोकप्रिय ठरलेला करण सोनावणे विशेष चर्चेत आहे. दरम्यान हिंदी बिग बॉस 19 मध्ये टॉप 5 मध्ये जाऊन आलेला मराठमोळा प्रणित मोरे याने नुकताच बिग बॉस मराठीच्या घरात दाखल झालेल्या करण सोनावणेला उद्देशून एक पोस्ट केलीय. ही पोस्ट सध्या चर्चेत आहे.
काय म्हणाला प्रणित मोरे?
करणच्या एन्ट्रीनंतर त्याच्या मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अभिनेता प्रणित मोरेने ग्रँड प्रीमियरमधील व्हिडीओ शेअर करत, “भाऊ, तुला टीव्हीवर पाहून खूप आनंद झाला,” अशी प्रतिक्रिया दिली. याशिवाय करणच्या अनेक जवळच्या मित्रांनी त्याच्या ‘बिग बॉस मराठी 6’मधील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी मुलाकडून दुसऱ्या मराठी मुलाला सपोर्ट केलाय. त्यामुळं या पोस्टची जोरदार चर्चा आहे. प्रणितने करणचा फोटो शेअर करत इंस्टाग्राम वर स्टोरी टाकली आहे. दरम्यान, प्रणित मोरे नुकत्याच पार पडलेल्या हिंदी ‘बिग बॉस’च्या सीझनमुळे चर्चेत होता. ‘बिग बॉस 19’मध्ये सहभागी झालेला तो एकमेव मराठी स्पर्धक होता आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांकडून त्याला चांगलंच प्रेम मिळालं.
करण सोनावणेची बिग बॉसच्या घरात एन्ट्री
‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात करणने दिमाखदार एन्ट्री करताच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. रिल स्टार म्हणून ओळख असलेला करण ‘फोकस इंडियन’ या नावानेही सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या करणने मेहनत आणि सातत्याच्या जोरावर काही वर्षांतच सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
करणचे अनेक रिल्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले असून, त्याचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. भारताच्या क्रिकेट सामन्यांपासून ते IPL मधील मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंंसोबत त्याने रिल्स केल्या आहेत. तसेच काही बॉलिवूड कलाकारांसोबतही त्याचे मजेशीर व्हिडीओ चर्चेत राहिले आहेत. ‘बिग बॉस’च्या मंचावर करणची ‘ऑरेंज ज्यूस गँग’ही हजर राहिली होती.आता ‘बिग बॉस मराठी 6’मध्ये करण सोनावणे नेमका कसा खेळ करणार, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. खऱ्या आयुष्यातील त्याचा विनोदी आणि सहज स्वभाव घरातही दिसणार का, आणि तो इतर स्पर्धकांसह प्रेक्षकांचं किती मनोरंजन करणार, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.