Prakash Raj On PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra MOdi) यांनी तेलंगणातील कार्यक्रमात बोलताना 7 मोठी आवाहनं केली. वर्षभर सोने खरेदी टाळा, सार्वजनिक वाहतूक वापरण्यावर भर द्या अशा अनेक सूचनांचा यात समावेश होता. देशभरातील नागरिकांकडून यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, सिंघम, वॉन्टेड, जननायकन सारख्या हिंदी चित्रपटांमधून काम केलेल्या बड्या अभिनेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आश्वासनांचा पाढा वाचत त्यांच्यावर जहरी टीका केली. अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी बीजेपी सरकारला अपयशी म्हणत ' सरकार आपल्या श्रीमंत मित्रांचे कर माफ करते आणि नागरिकांना त्याग करण्यास सांगते ' अशी टीका केली. x माध्यमावर पोस्ट केलेल्या ट्विट्सची सध्या मनोरंजनसृष्टीत चर्चा आहे.
केंद्र सरकारवर अर्थव्यवस्था उध्वस्त केल्याचा आरोप
प्रकाश राज यांनी सरकारच्या जुन्या आश्वासनांची आठवण करून देत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाजप सरकारची खिल्ली उडवली. त्यांनी केंद्र सरकारला “नाकाम” म्हणत अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला. “हीच वस्तुस्थिती आहे आणि देशातील जनतेने ती समजून घेतली पाहिजे,” असं त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलं. याआधीही प्रकाश राज यांनी भाजपला “वॉशिंग मशीन पार्टी” म्हटलं होतं. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींच्या आवाहनावर टीका केली. “देश चालवणं आता ‘कॉम्प्रोमाइज्ड पीएम’च्या हातात राहिलेलं नाही,” असं म्हणत त्यांनी सरकारवर निशाणा साधला.
री-पोस्ट करत प्रकाश राज यांचा संताप
यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश राज यांनी लिहिलं, “नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली... लोकांना थाळ्या वाजवायला आणि ‘गो कोविड गो’ म्हणायला लावलं... 2 कोटी नोकऱ्या, 100 स्मार्ट सिटी आणि खात्यात 15 लाख रुपयांच्या आश्वासनांनी लोकांची फसवणूक केली... सामान्य माणसाकडून ‘गब्बर सिंग टॅक्स’ वसूल केला, पण श्रीमंत मित्रांचे कर माफ केले... आणि आता नागरिकांना त्याग करण्यास सांगत आहेत, कारण सरकार देश चालवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे.”
'हा पक्ष सर्व काही उद्ध्वस्त करतोय ' प्रकाश राज यांची टीका
‘वाँटेड’, ‘सिंघम’ आणि ‘जन नायकन’सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेल्या 61 वर्षीय प्रकाश राज यांनी याआधीही आणखी एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी तमिळनाडूच्या राजकारणावर केलेल्या पंतप्रधान मोदींच्या विधानावर टीका केली होती.
ANI चा व्हिडीओ री-पोस्ट करत त्यांनी लिहिलं, “तुम्ही स्वतःच्या पक्षाकडेही कधी पाहणार आहात का? ही पार्टी सर्व काही उद्ध्वस्त करत आहे... पाठीत खंजीर खुपसत आहे... प्रादेशिक पक्ष फोडत आहे... घटनात्मक पद्धतीने निवडून आलेल्या सरकारांना सत्तेतून हटवत आहे... भ्रष्ट नेत्यांना ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून त्यांची प्रतिमा स्वच्छ करत आहे... आणि बलात्कारी व मारेकऱ्यांचा सत्कार करत आहे.”
PM मोदींच्या 7 आवाहनांची देशभर चर्चा
पश्चिम आशियातील संघर्ष, तेलपुरवठ्यावरील अनिश्चितता आणि जागतिक बाजारातील अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी रविवारी सिकंदराबाद आणि हैदराबादमधील सभांमध्ये देशवासीयांना 7 मोठ्या अपील केल्या. त्यामध्ये एक वर्ष सोनं न खरेदी करण्याचं आणि पुन्हा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याचं आवाहन केल्याने देशभरात मोठी चर्चा रंगली आहे.
