Prajakta Gaikwad On Wedding Entry Controversy: काही दिवसांपूर्वी 'स्वराज्यरक्षक संभाजी' (Swarajyarakshak Sambhaji) मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajakta Gaikwad) हिनं उद्योगपती शंभूराज खुटवड (Shambhuraj Khutwad) याच्याशी आपली लग्नगाठ बांधली. प्राजक्ताचं लग्न ठरल्यापासूनच तिच्या आणि शंभूराजच्या लगीनघाईची चर्चा रंगलेली. त्यानंतर प्राजक्ता शंभूराजचा शाही विवाहसोहळा (Prajakta Gaikwad On Wedding Entry Controversy) तर डोळे दिपवणारा होता. जेवढी चर्चा प्राजक्ताच्या अख्ख्या विवाहसोहळ्याची झाली, तेवढीच किंवा त्याहून कित्येक पटींनी जास्त चर्चा प्राजक्ता आणि शंभूराजनं रिसेप्शनसाठी दणक्यात घेतलेल्या ग्रँड एन्ट्रीची झाली.
प्राजक्ता आणि शंभूराजची एन्ट्री डोळ्यांचं पारणं फेडणारी भव्य अशी होती. एका भव्यदिव्य अशा नंदीवर बसून प्राजक्ता गायकवाडनं दणक्यात एन्ट्री घेतली. अनेकांना एन्ट्री आवडली, पण काहींना मात्र ही एन्ट्री जास्तच खटकली. या ग्रँड एन्ट्रीसाठी प्राजक्ता आणि शंभूराज एका भव्यदिव्य अशा नंदीवर बसलेले. त्या मिरवणुकीत पुढे भगवान शंकर आणि शिवगण पायी चालत होते. मराठमोळ्या परंपरेचा हा शाही थाटबाट लक्ष वेधणारा ठरला. प्राजक्ता, शंभूराजची नंदीवरुन एन्ट्री होत असताना फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. पण, सर्व अगदी थाटामाटात, धुमधडाक्यात सुरू असताना उपस्थितांना जे खटकलं नाही, ते नेटकऱ्यांनी हेरलं आणि प्राजक्ता गायकवाडला फैलावर धरलं. ती गोष्ट म्हणजे, प्राजक्ता, शंभूराजच्या ग्रँड एन्ट्रीवेळी पायी चालणारे भगवान शंकर.
काहींना आमची एन्ट्री निगेटिव्ह वाटली पण... : प्राजक्ता गायकवाड
प्राजक्ता गायकवाड आणि तिचे अहो शंभूराज खुटवड यांनी नुकतीच 'लोकमत फिल्मी'ला जोड्यानं मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना प्राजक्ता आणि शंभूराजनं लग्न आणि लग्नानंतरच्या एकमेकांसोबतचं नातं यावर मनमोकळ्या गप्पा मारल्या. याच मुलाखतीत बोलताना प्राजक्तानं तिच्या लग्नातल्या रिसेप्शनच्या ग्रँड एन्ट्रीवरही स्पष्टीकरण दिलंय. प्राजक्ता गायकवाड म्हणाली की, "लग्नातील सगळे इव्हेंट्स साधे आणि सुटसुटीत ठेवले होते. संगीत, हळद आणि विशेषतः आमची एन्ट्री खूप स्पेशल होती, अनेकांना ती आवडली, पण काहींना ते फार निगेटिव्ह वाटलं. मला प्रेक्षकांना सांगायचंय की, ज्या दिवशी लग्न असतं, त्या दिवशी ते वधू आणि वर हे फक्त स्त्री आणि पुरुष नसून लक्ष्मी-नारायणाचं स्वरूप असतात, याचा उल्लेख पुराणांतही आहे. नंदीवरून केलेली आमची एन्ट्री ही शिव-पार्वती विवाहाची संकल्पना आणि शिवगणांशी जोडलेली होती. खूपच युनिक आणि अगदी वेगळी एन्ट्री होती. मला मोठ्ठ्यानं डीजे लावलाय आणि तिथे सगळे नाचतायत, अशी अजिबात एन्ट्री नको होती... मला स्पिरिच्युअल आणि अर्थपूर्ण करायचं होतं. शिवाय त्यांचं नाव शंभुराज असल्यामुळे ही संकल्पना नावाशीही जोडलेली होती. आता आमच्या लग्नामुळे हे ट्रेंडमध्ये येईल, असं वाटतंय."
लग्न महाबळेश्वरला होणार होतं, पण अचानक... : प्राजक्ता गायकवाड
शाही विवाहसोहळ्याबाबत बोलताना प्राजक्ता गायकवाड म्हणाली की,"खरंतर, जसं बाकीच्यांचं लग्न होतं तसंच हे नॉर्मल लग्न होतं. पण, लोकांना हे लग्नकार्य आपलंसं वाटलं.सगळ्यांनी ते आपुलकीने ते उचलून धरलं. हे लग्न इतरांसारखंच साधं होतं, सर्व पारंपरिक विधी झाले. पण लोकांनी ते आपुलकीने स्वीकारलं. रिल्स, फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले. माझ्या महाराणी येसूबाईंच्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील लोकांशी असलेला कनेक्ट यामागचं कारण असावं. बाकी लग्नामध्ये आम्ही काहीही वेगळं केलं नव्हतं."
मग प्राजक्तानं सांगितलं की, "मला लग्नात अवाजवी खर्च करायचा नव्हता.मर्यादित लोकांत साधं लग्न करावं, असं माझं मत होतं. पुण्यामध्ये होणाऱ्या लग्नांमध्ये पाच-दहा हजारांचा क्राऊड असतोच. इतक्या मोठ्या लेव्हलची लग्न पुण्यात होतात. शिवाय लोकांची मानसिकता अशी असते की, एक पदार्थ खायचा असतो आणि ताटामध्ये खूप पदार्थ घेतलेले असतात. त्यामुळे खूप अन्न वाया जातं. सगळीकडे अन्न सांडलेलं असतं असं मला अजिबात होऊ द्यायचं नव्हतं.आई-वडिलांच्या कष्टाने कमावलेले पैसे वाया जाऊ नयेत, हीही भावना होती. सुरुवातीला महाबळेश्वरला डेस्टिनेशन वेडिंग ठरवलं होतं, पण नंतर काही कारणांमुळे लग्न पुण्यात करावं लागलं आणि पाहुण्यांची संख्या वाढली. तरीसुद्धा सगळा कार्यक्रम खूप छान पार पडला."