Prabhas: साऊथचा सुपरस्टार प्रभास सध्या आपल्या लेटेस्ट रिलीज ‘द राजा साब’मुळे चर्चेत आहे. ‘रिबेल स्टार’ म्हणून ओळख असलेल्या प्रभासची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. ‘बाहुबली’मधील महेंद्र बाहुबलीच्या भूमिकेनं त्याला घराघरात पोहोचवलं. त्यानंतर ‘सालार’ आणि ‘कल्की 2898 एडी’सारख्या चित्रपटांनी त्याच्या करिअरला आणखी लोकप्रियता दिली. मेहनत आणि सातत्याच्या जोरावर प्रभास आज भारतीय सिनेमातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक आहे. चाहत्यांच्या मनात प्रभाविषयी कायम प्रश्न असतात. प्रभासच्या पूर्ण नावापासून त्याचं नेटवर्थ,  आवडत्या फिल्म्स अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सगळं जाणून घ्या...

प्रभासचं पूर्ण नाव काय?

प्रभासचं पूर्ण नाव उप्पलापति वेंकट सूर्यनारायण प्रभास राजू आहे. प्रभासचा जन्म 23 ऑक्टोबर 1979 रोजी चेन्नई येथे झालाय. त्यानं चेन्नईतील डॉन बॉस्को मॅट्रिक्युलेशन हायर सेकंडरी स्कूल आणि भिमावरमच्या डीएनआर हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. पुढे हैदराबादच्या श्री चैतन्य कॉलेजमधून बीटेक पदवी घेतली. सत्यनंद फिल्म इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी शिक्षण घेतलं. प्रभासने 2002 साली ‘ईश्वर’ या चित्रपटातून पदार्पण केलं. मात्र 2004 मधील ‘वर्षम’ या सिनेमानं त्यांना खरी ओळख मिळवून दिली. पुढे ‘बाहुबली 1’ आणि ‘बाहुबली 2’  नंतर त्याला पॅन-इंडिया सुपरस्टार बनवलं.

प्रभासच्या कुटुंबात कोण कोण आहे?

प्रभासचा तेलुगू कुटुंबात जन्म झाला. त्याचे वडील उप्पलापति सूर्यनारायण राजू हे चित्रपट निर्माते होते, तर आईचं नाव शिवा कुमारी आहे. प्रभास तीन भावंडांपैकी सर्वात लहान आहे. त्याचे काका कृष्णम राजू हे प्रसिद्ध तेलुगू अभिनेते असून त्यांनीच प्रभासला चित्रपटसृष्टीत येण्यासाठी प्रेरणा दिली. प्रभासला व्हॉलीबॉल खेळण्याची आवड आहे. प्रभास 6 फूट 1 इंच उंच आहे. प्रभास अद्याप अविवाहित आहे. तो आपली वैयक्तिक आयुष्य खूप खासगी ठेवतो. प्रभास प्रचंड खवय्या आहे. 

प्रभासची नेटवर्थ किती?

प्रभासच्या फेव्हरेट लिस्टमध्ये राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘3 इडियट्स’ यांचा समावेश आहे. फोर्ब्स इंडियानुसार, 2025 पर्यंत प्रभासची अंदाजे नेटवर्थ 241 कोटी रुपये होती. प्रभास एका चित्रपटासाठी 80 ते 150 कोटी रुपये मानधन घेतो,असं सांगण्यात येतं., त्यामुळे तो भारतीय सिनेमातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये गणला जातो.

रोल्स रॉयससह अनेक उंची गाड्या

2015 साली प्रभासने कोणताही गाजावाजा न करता रोल्स रॉयस फँटम ही आलिशान कार खरेदी केली होती. ‘द फायनान्शियल एक्सप्रेस’च्या माहितीनुसार, या लक्झरी सेडानची किंमत 8 ते 9 कोटी रुपये होती. विशेष म्हणजे, ही कार खरेदी केल्यानंतर प्रभासने मीडिया समोर येणं टाळत, फक्त जवळच्या मित्रांसोबत खासगी पार्टी करून आनंद साजरा केला होता. प्रभासची BMW X3  या कारची किंमत अंदाजे 68 लाख रुपये आहे.

60 कोटींचं फार्महाऊस, कोट्यवधींची जिम इक्विपमेंट 

जुबिली हिल्समध्ये वसलेलं प्रभासचं हैदराबादमधील फार्महाऊस सुमारे 60 कोटी रुपये आहे. खासगी जिम, स्विमिंग पूल, ध्यानधारणा करण्यासाठी स्वतंत्र जागा आणि हिरवळीने नटलेलं विस्तीर्ण परिसर आहे. बाहुबली’साठी प्रभासने केलेलं बॉडी ट्रान्सफॉर्मेशनही स्वस्त नव्हतं. प्रेक्षकांनी त्याचा फिट आणि मस्क्युलर लूक पाहून थक्क झाल्यानंतर एक मोठा खुलासा समोर आला होता. चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रभासला घरात बसवलेलं प्रीमियम जिम इक्विपमेंट भेट दिलं होतं, ज्याची किंमत सुमारे 1.5 कोटी रुपये आहे.

प्रभासच्या करिअरमधील मोठ्या हिट्स आणि पुरस्कार?

‘बाहुबली’, ‘बाहुबली 2: द कन्क्लूजन’, ‘कल्की 2898 एडी’, ‘मिर्ची’, ‘सालार’, ‘डार्लिंग’, ‘मिस्टर परफेक्ट’, ‘वर्षम’ अशा अनेक हिट चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. दमदार अ‍ॅक्शन आणि अभिनयासाठी त्याला अनेक पुरस्कार मिळाले असून ‘बाहुबली 2’साठी SIIMA बेस्ट लीड अ‍ॅक्टर पुरस्कारही त्यात समाविष्ट आहे.

प्रभासचा ‘द राजा साब’ चित्रपट 9 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झाला आहे. याशिवाय संदीप रेड्डी वांगा यांचा ‘स्पिरिट’, प्रशांत नील यांचा ‘सालार 2’ आणि हनु राघवपुडी यांचा ‘फौजी’ हे चित्रपट येत्या काळात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.