Bollywood Director on Ranveer Singh: गेल्या काही दिवसांपासून 'धुरंधर ' फेम अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) सातत्याने चर्चेत आहे. आधी 'कांतारा' चित्रपटाच्या मिमिक्रीवरून अंगाशी आलेला वाद संपतो ना संपतो तोच 'फेडरेशन ऑफ वेस्टन इंडिया सिने एम्प्लॉईज ' ने त्याला बॅन केलं. धुरंधरच्या अभूतपूर्व यशानंतर 'डॉन 3' चित्रपटात झळकणार असल्याच्या चर्चांमुळे चाहते सुखावले होते. मात्र, अचानक त्याने माघार घेतल्याने मोठी खळबळ उडाली. रणवीरच्या अशा बेभरवशी वागण्यामुळे FWICEने त्याला बॅन केलं. रणवीरच्या अडचणींमध्ये वाढ होत असताना बॉलीवूडच्या एका दिग्दर्शकांनं रणवीरची बाजू घेतलीय. दिग्दर्शक कुणाल कोहली (Kunal Kohli) यांनी एका मुलाखतीत अभिनेत्यांच्या करिअरमध्ये चढ-उतार येतच असतात असं सांगत 'आज रणवीर हिट चित्रपट देईल, उद्या फ्लॉपही देईल ' असं म्हणत त्याचं समर्थन केलं आहे.

Continues below advertisement

दिग्दर्शक कुणाल कोहली काही दिवसांपूर्वी धुरंधर चित्रपटाचे जोरदार कौतुक केल्यामुळे चर्चेत आले होते.आता त्यांनी पुन्हा एकदा रणवीर सिंहची बाजू घेत केवळ बॉक्स ऑफिसच्या आकड्यांवरून कलाकारांचे मूल्यमापन करणाऱ्यांना चपराक लगावली आहे. स्टारडम अपयश आणि कलाकाराची खरी ओळख याबद्दल त्यांनी त्यांची स्पष्ट मते मांडली.

काय म्हणाले कुणाल कोहली ?

एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत कुणाल कोहली यांना विचारण्यात आलं की, एखाद्या स्टारचा वाईट काळ आला की इंडस्ट्री आणि प्रेक्षक त्यावर जास्तच प्रतिक्रिया देतात का? त्यावर त्यांनी म्हटलं, “कोणताही मोठा स्टार फ्लॉप चित्रपटापासून वाचू शकत नाही. प्रत्येकाच्या कारकिर्दीत फ्लॉप चित्रपट येतोच. हे टाळणं शक्य नाही. अभिनेता, निर्माता किंवा दिग्दर्शक असो, अपयश प्रत्येकाच्या वाट्याला येतंच. अपयशाचं एवढं मोठं चित्र रंगवणं बंद केलं पाहिजे. रणवीर सिंह पुन्हा एक हिट फिल्म देईल आणि पुन्हा फ्लॉपही देईल. हे त्याच्या करिअरचा भाग आहे. त्यात काही वेगळं नाही. चित्रपट चांगला आहे का? होय, मग पुढे जा. फ्लॉप झाला तरी त्यातून खूप काही शिकायला मिळतं.”असं ते म्हणाले.

Continues below advertisement

‘कलाकाराला फक्त बॉक्स ऑफिसवरून जज करू नका’

कुणाल कोहली यांनी फक्त तिकीटबारीच्या कमाईवरून कलाकारांची किंमत ठरवणाऱ्या प्रेक्षकांवरही टीका केली. ते म्हणाले, “रणवीर सिंह एक उत्कृष्ट अभिनेता आहे. ‘धुरंधर’मधील त्याचे काही सीन अप्रतिम आहेत. त्याच्या काही फ्लॉप चित्रपटांमध्येही त्याने जबरदस्त काम केलं आहे. मग फक्त बॉक्स ऑफिसवरून एखाद्याचं मूल्यमापन का करायचं? जर तुम्ही केवळ कमाईच्या आधारावर कलाकारांना जज करत असाल, तर ती प्रेक्षक म्हणून तुमची मर्यादा आहे.”

‘धुरंधर 2’चंही केलेलं कौतुक

याआधीही कुणाल कोहली यांनी ‘धुरंधर 2’चं भरभरून कौतुक केलं होतं. इंस्टाग्रामवरील एका व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटलं होतं, “अभिनंदन आदित्य धर , रणवीर सिंह आणि जिओ स्टुडीओ. एका दिवसात 100 कोटींपेक्षा जास्त कमाई दोनदा करणं ही मोठी गोष्ट आहे. ‘धुरंधर’ भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला आहे.” असं त्यांनी म्हटलेलं.

दरम्यान, ‘धुरंधर’च्या सिक्वेलमध्ये रणवीर सिंह साकारत असलेल्या हमजा अली मजारी उर्फ ‘शेर-ए-बलूच’ची कथा पुढे नेण्यात आली आहे. जसकिरत सिंह रंगीपासून भारतीय गुप्तहेर बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. भारतावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी तो पाकिस्तानमध्ये घुसखोरी करताना दिसतो.