1800 कोटींमध्ये ‘करिअर’ विकलं! 766 गाण्यांचा सौदा, इंडस्ट्रीपासून दूर गेली 'ही' वादग्रस्त पॉप स्टार
तिचा एक अल्बम इतिहासातील बेस्ट सेलिंग अल्बमपैकी एक ठरला.25 वर्षांच्या कारकिर्दीत 766 हिट गाण्यांना आवाज देणाऱ्या या गायिकेने घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांनं धक्का बसलाय.

Popstar Britney Spears: जगभरातील संगीतविश्वावर राज्य करणाऱ्या एका पॉप गायिकेने तब्बल 1800 कोटी रुपयांना आपलं संपूर्ण संगीत करिअर विकल्याची बातमी समोर आली आहे. 25 वर्षांच्या कारकिर्दीत 766 हिट गाण्यांना आवाज देणाऱ्या या गायिकेने घेतलेल्या या निर्णयाने चाहत्यांनं धक्का बसलाय. ही गायिका म्हणजे ‘प्रिन्सेस ऑफ पॉप’ म्हणून ओळखली जाणारी अमेरिकन सुपरस्टार ब्रिटनी स्पीयर्स. दमदार आवाज, जबरदस्त स्टेज परफॉर्मन्स आणि ग्रॅमीसह अनेक पुरस्कारांच्या जोरावर तिने पॉप संस्कृतीला जागतिक स्तरावर नवं रूप दिलं आहे.
25 वर्षांचं करिअर आणि 766 गाण्यांचा सौदा
ब्रिटनीने 1999 मध्ये ‘...Baby One More Time’ या गाण्याद्वारे संगीतविश्वात पदार्पण केलं. हा अल्बम इतिहासातील बेस्ट सेलिंग अल्बमपैकी एक ठरला. त्यानंतर ‘Oops!... I Did It Again’ सारख्या गाण्यांनी विक्रीचे नवे विक्रम रचले. मात्र आता 44 वर्षीय ब्रिटनीने इंडिपेंडंट म्युझिक पब्लिशर ‘प्रायमरी वेव्ह’ला आपल्या 766 गाण्यांचे हक्क सुमारे 1816 कोटी रुपयांना विकल्याचं वृत्त आहे. 2024 मध्ये तिने संगीत क्षेत्रात पुनरागमन करणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.
यशासोबत वादांचं सावट
ब्रिटनीचं आयुष्य केवळ यशस्वी नव्हतं, तर वादांनीही गाजलेलं आहे. 2007 हे वर्ष तिच्यासाठी अत्यंत कठीण ठरलं. पती केविन फेडरलाइनपासून घटस्फोट आणि मुलांची कस्टडी गमावल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या खचली. त्याच काळात तिने डोक्याचे केस कापून टाकले आणि छत्रीने एका फोटोग्राफरच्या गाडीवर हल्ला केल्याची घटना चर्चेत आली.
2008 मध्ये न्यायालयाने तिच्या मानसिक स्थितीचा हवाला देत तिच्या वडिलांना कायदेशीर संरक्षक (Conservator) नेमलं. या निर्णयाविरोधात #FreeBritney चळवळही उभी राहिली. अखेर अनेक वर्षांनंतर तिला या नियंत्रणातून मुक्तता मिळाली. सध्या ब्रिटनी संगीतविश्वापासून दूर असून सोशल मीडियावर सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर ती विविध व्हिडिओ आणि फोटो शेअर करत नेहमी चर्चेत असते.
























