मुंबई : कलाकारांना सोशल मीडिया फार जवळचा वाटत असतो. अगदी जेव्हा सोशल मीडियाच्या वर्तुळात ऑर्कुटची एंट्री झाली तेव्हापासून कलाकारही सोशल मीडियाला जवळून पाहू लागले. पुढे त्याची जागा फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम यांनी घेतली. फेसबुकवरही कलाकार बोलत होते. आपल्या मनातल्या गोष्टींना वाट करून देत होते. पण कालांतराने कलाकारांच्या जवळ आलं ते इन्स्टाग्राम. इन्स्टाग्रामवर कलाकारांना आपले फोटो टाकणं सोपं झालं. पण आता कलाकारांच्या फोटोवरूनही अनेक मंडळी त्या त्या कलाकारांना ट्रोल करू लागली आहेत. असाच काहीसा प्रकार अभिनेत्री पूजा सावंतबाबत झाला. पण पूजाने मात्र त्या कमेंटला चोख उत्तर दिलं.


पूजा सावंत हा मराठी मनोरंजनविश्वातला ग्लॅमरस चेहरा आहे. मराठीमध्ये तिने अनेक वेगवेगळे चित्रपट दिले. यात भेटली तू पुन्हा, दगडी चाळ अशा चित्रपटांचा समावेश होतो. तिची गुणवत्ता हेरून तिला हिंदी चित्रपटांचीही ऑफर आली. जंगली या चित्रपटात विद्युत जामवालसोबत ती दिसली. त्या सिनेमात तिला नायिकेची भूमिका मिळाली. आता सध्या पूजा एका डान्स रियॅलिटी शोची परीक्षक बनली आहे. लोभस चेहरा आणि आकर्षक फिगर यामुळे पूजाचे इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स झाले नसते तरच नवल. पूजाही आपल्या या फॅमिलीची काळजी घेत असते. आपले नवनवे फोटो टाकून ती आपल्या चाहत्यांना खुश ठेवत असते. तिच्या फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडत असतो. पण परवा मात्र एक गंमत झाली. पूजाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर टाकले. यावर कमेंटमध्ये मात्र तिने परिधान केलेल्या कपड्यांवर नाराजी नोंदवणारा सूर उमटला. मग मात्र पूजा संतापली.


पूजाने या कमेंटचा यथेच्छ समाचार घेतला. त्याला उत्तर देताना पूजा म्हणाली, आम्ही काय आणि कसे कपडे घालायचे हे आम्हाला कुणी सांगू नये. मुळात कपडे घालताना तारतम्य आणि विवेक आम्हालाही असतो. तिच्या या कमेंटचीही भरपूर तारीफ होते आहे. खरंतर पूजाने हे उत्तर देऊन कलाकारांच्या मनातल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. कलाकार हे नेहमची सॉफ्ट टारगेट असतात. त्यांना काही बोललं तरी चालतं असा एक समज सोशल मीडियातल्या जगात रुढ होतो आहे. पण पूजाच्या कमेंटने त्याला चोख उत्तर दिलं आहे. यापूर्वी इतर कलाकारांनाही फोटोमुळे ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. काही दिवसांपूर्वी मिताली मयेकरने मद्याच्या बाटल्यांसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर टाकला होता. त्यावरूनही ट्रोलर्सनी तिला पार हैराण केलं होतं. त्यानंतर संतोष जुवेकरनेही लॉकडाऊननंतर क्लीन शेव केलेला फोटो टाकल्यानंतर काहींनी त्याला अत्यंत अपमानजनक उपमा दिली होती. पण संतोषने आपलं तारतम्य न सोडता त्याला उत्तर दिलं होतं. आता पूजानेही थेट उत्तर द्यायचं शस्त्र हाती घेतलेलं दिसतं.


खरंतर पूजाची ही बाजू बरोबरही आहे. कारण इन्स्टाग्रामवर फोटो टाकताना निदान आपले मराठी कलाकार सर्व तऱ्हेने विचार करतात. कोणते फोटो कधी टाकायचे याचं भान या कलाकारांना असतं. सध्या इन्स्टाग्रामवर बरेच कलाकार नेटकऱ्यांच्या गळ्यातले ताईत आहेत. यात आवर्जून उल्लेख करायला हवा तो मिथिला पालकर, पूजा सावंत, प्रिया बापट, भूषण प्रधान, ह्रता दुर्गुळे आदी कलाकारांचा. पूजाने ही कलाकारांचीही एक बाजू मांडल्यामुळे तिच्यासारख्या अनेक कलाकारांना हायसं वाटलं असणार यात शंका नाही.