मुंबई : एक ट्रीप माणसाला शहाणं करते का? तर होय. त्या ट्रीपमध्ये तुम्हाला आलेले अनुभव.. तुम्ही केलेल्या तडजोडी.. आलेल्या अडचणींवर केलेली मात यातून तुम्ही शहाणं होता. असं कुणीतरी म्हटलं आहे. ते खोटं नाही. अभिनेत्री श्रिया पिळगांवकरलाही अशाच ट्रीपने खूप काही दिलं. ही ट्रीप होती जपानची. ती एकटी जपानला गेली. त्यानंतर तिथे तिला जे अनुभव आले.. तिथे तिचा जो कााही संवाद झाला स्वत:शी त्यातून तिला जगण्याचं खूप मोठं बळ मिळालं असं ती सांगते. श्रियाची नवी फिल्म येतेय नेटफ्लिक्सवर. या निमित्त ती एबीपी माझाशी बोलती झाली. निमित्त सिनेमाचं असलं, तरी बऱ्याच गोष्टींवर या गप्पा झाल्या. अगदी ती करत असलेले प्रोजेक्टस, तिच्या आई-वडिलांनी तिला दिलेली शिकवण या अनेक गोष्टींवर ती बोलती झाली.

अली फजल आणि श्रिया नेटफ्लिक्सवरच्या 'हाऊस अरेस्ट' या सिनेमातून एकत्र येत आहेत. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात ती एका पत्रकाराची भूमिका साकारतेय. या फिल्मबद्दल ती म्हणाली, "या सिनेमाची कन्सेप्ट मला खूप आवडली. काही कारणाने घराबाहेर न पडणारा मुलगा.. त्यातून येणारे प्रसंग आणि ते कळल्यानंतर त्याची मुलाखत घ्यायला आलेली पत्रकार.. गोष्ट आवडल्यामुळे ही ती स्वीकारली."

श्रिया ही सचिन आणि सुप्रिया पिळगांवकर यांची मुलगी हे अवघा महाराष्ट्र जाणतो. असं असलं तरी श्रियाने आपली अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिने शॉर्ट फिल्म्स दिग्दर्शित केल्या आहेत. शिवाय मराठी सिनेमात कामही केलं आहे. फॅन, मिर्झापूर आणि आता तिचा हाऊस अरेस्ट हा सिनेमा येतोय. खूप वेगवेगळ्या व्यासपीठांवर ती काम करते आहे. तिच्याशी बोलताना ते जाणवतं. अनेक दिग्दर्शकांसोबत काम करण्याचा अनुभवही तिच्या पाठीशी आहे. अलिकडे आलेल्या वेबसीरिजच्या माध्यमाचंही तिला आकर्षण आहे. या अनुभवाबद्दल बोलताना ती म्हणाली, "अनेक दिग्दर्शकांच्या हाताखाली काम केल्यानंतर एक लक्षात येते ती म्हणजे त्यांची पॅशन. सगळे झपाटून काम करत असतात. शिवाय माध्यम वेगवेगळी असल्यामुळे तिथे काम करायची मजा असते. वेबसीरीज हे त्यापैकी एक माध्यम आहे."

सोशल मीडियावरही श्रियाचं मोठं फॉलोईंग आहे. सोशल मीडियावर सेलिब्रिटींना सतत मारल्या जाणाऱ्या टोमण्यांबद्दल बोलताना ती म्हणते, "आपण सोशल मीडियावर आलो तेव्हाच हे लक्षात घ्यायला हवं की आपल्याला नव्या माध्यमाला सामोरं जायचं आहे. इथे लोक बोलणारच. कारण हाताच्या एका बोटावर त्यांना मोठं व्यासपीठ उपलब्ध झालं आहे. अशावेळी आपण शांत राहणं महत्त्वाचं."

श्रियाशी बोलताना तिचं प्रगल्भ व्यक्तिमत्व सतत जाणवत राहतं. याशिवाय इतर अनेक गोष्टींवर तिने ठामपणे आपली मतं मांडली आहेत. त्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटवरचा हा व्हिडीओ तुम्हाला पाहावा लागेल.