Payal Jadhav mother defeats cancer emotional Instagram post: झगमगत्या जगामागे बऱ्याचदा कलाकार दु:खाचे चेहरे लपवतात. दु:ख बाजूला सारून अनेक कलाकार अभिनयाचा मुखवटा घालतात. मराठी अभिनेत्री पायाल जाधवसोबत अशीच एक घटना घडली. तिनं आपल्या आईची काळजी घेत, तिला कॅन्सरच्या दाढेतून बाहेर काढले. पायल जाधवच्या आईनं कॅन्सरसारख्या आजारावर मात केली. दरम्यान, तो काळ नक्कीच माय लेकींसाठी कठीण होता. या कठीण काळाला मात देत पायल आपल्या आईच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. पायलनं नुकतीच सोशल मीडियावर आईविषयी एक भावनिक पोस्ट लिहिली. तिनं आपल्या आईनं कशापद्धतीने कॅन्सरवर मात केली, याबाबत माहिती दिली.
पायल जाधव ही मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री. तिनं आतापर्यंत मालिका तसेच चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारली. अबीर गुलाल या मालिकेतून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. थ्री ऑफ अस, पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय, या चित्रपटातही तिनं उत्तम भूमिका साकारली. पायल जाधव सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिनं आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त एक खास पोस्ट शेअर केली आहे.
तिनं पोस्टमध्ये म्हटलं की, 'वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी प्रेमळ आई. मला आज एका गोष्टीचा प्रचंड आनंद होत आहे. तू कॅन्सरसारख्या गंभीर आजारावर खंबीरपणे मात केलीस. पुन्हा अध्यापनाचं तुझं आवडीचा काम सुरु ठेवलंस. खऱ्या अर्थाने आज तुझा वाढदिवस आहे, असं मला वाटत आहे. तुझ्या या प्रवासात, तुझं लेकरु होता आलं, याचं मला समाधान आहे. आज तिच्या वाढदिवसानिमित्त मी त्या सर्वांचे आभार मानेन, ज्यांनी तुला आपलेपणानी मदत केली. आपल्या फॅमिलीसोबत उभे राहिले. तुझ्या हातून कायम शिक्षणाचं कार्य घडत राहो..' असं म्हणत पायलने आपल्या भावना व्यक्त केल्या.
पायलनं पोस्ट करत आईच्या लढाईचं कौतुक केलं आहे. जे कुणी कॅन्सरशी झुंज देत आहेत, त्यांच्यासमोर एक मोठं उदाहरण समोर ठेवलं आहे. पायलच्या आईनं कॅन्सरवर यशस्वी मात केली. तसेच कामाला देखील सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्यापूर्वी पायलच्या आई वडिलांनी तिच्या निर्णयाचे स्वागत केले. तिच्या करिअरमध्ये तिच्या पालकांचा मोठा वाटा आहे.
