Pawan Kalyan :  चित्रपट रसिकांचे आपल्या आवडत्या कलाकारांवर प्रेम असते.  दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या आवडत्या कलाकारांवर चाहते अक्षरक्ष:जीव ओवाळून टाकतात. या वेडापायी काही घटनाही घडतात. अशीच एक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली. सुपरस्टार पवन कल्याण (Pawan Kalyan) याच्या चाहत्यांनी तर थेट थिएटरमध्ये आग लावली. 12 वर्षानंतर री-रिलीज झालेल्या या चित्रपटाच्या वेळी ही घटना घडली.


वर्ष 2012 मध्ये 'कॅमरामॅथन गंगाथो रामबाबू' हा चित्रपट प्रदर्शित झालेला. पवन कल्याण याची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट आंध्र प्रदेशमधील नंदयाला थिएटर मालकांनी पुन्हा रिलीज केला. मात्र, हा निर्णय थिएटर मालकांना चांगलाच महागात पडला. आपल्या आवडीच्या सुपरस्टारच्या चित्रपटाच्या री-रिलीजचे सेलिब्रेशन करण्यासाठी काही चाहत्यांनी थिएटरमध्येच आग लावली. या घटनेचा व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 


वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पवन कल्याणचा चित्रपट 'कॅमरामॅथन गंगाथो रामबाबू'च्या री-रिलीज दरम्यान चाहत्यांनी नंदयालामधील थिएटरमध्ये कागद जाळले. व्हिडीओमध्ये कागद जाळत असताना चाहते जल्लोष करताना दिसत आहेत. इतकंच नव्हे तर आगीची तीव्रता वाढल्यानंतर त्यांनी घोषणाबाजी केली.  त्यानंतर काहींनी सीट्सही फाडल्या. 


या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत सहभागी असलेल्या चाहत्यांविरोधात गुन्हा दाखल झाला का, त्यांच्यावर कारवाई झाली का, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. 






याआधीदेखील पवन कल्याणच्या चाहत्यांनी केली होती तोडफोड 


पवनच्या चाहत्यांनी चित्रपटगृहांची  नासधूस करण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2021 मध्ये, जेव्हा तांत्रिक बिघाडामुळे चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये अडथळा निर्माण झाला होता. त्यावेळी चाहत्यांनी जोगुलांबा गडवाल येथील थिएटरची तोडफोड केली होती. याशिवाय 2023 मध्येही विजयवाडा येथे काही चाहत्यांनी मद्यधुंद अवस्थेत एका थिएटरची तोडफोड केली होती तेव्हा त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन  ताकीद दिली होती.


राजकारणात देखील सक्रिय


पवन कल्याण हे  राजकारणी देखील आहेत. 2008 पासून ते राजकारणात सक्रिय आहेत.  पवन कल्याण यांनी 2014  मध्ये स्वतःच्या पक्षाची स्थापना केली आहे. त्यांच्या या राजकीय पक्षाचे नाव जनसेना पक्ष आहे. 


इतर संबंधित बातम्या :