Paresh Rawal Hera Pheri 3: राजू, श्याम आणि राजू भैय्याची जोडी म्हणजे, मनोरंजनाचा ओव्हरडोस, हे चाहत्यांना पक्क ठाऊक आहे. त्यामुळे चाहते 'हेरा फेरी 3'ची (Hera Pheri 3) आतुरतेनं वाट पाहत आहेत.  पण, आता प्रेक्षकांना खळखळून हसवणारं हे त्रिकुट पुन्हा एकत्र दिसणार की नाही? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण, राजू भैय्याची भूमिका साकारणारे परेश रावल (Paresh Rawal) यांनी अचानक चित्रपटाचं शुटिंग सुरू असताना मधूनच एग्झिट घेतली आहे. परेश रावल यांनी अचानक घेतलेल्या निर्णयामुळे 'हेरा फेरी 3'ची संपूर्ण टीमच हादरली आहे. तर, सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांची चिंता वाढली आहे. दरम्यान, या प्रकरणी अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटींची लीगल नोटीसही धाडली (Akshay Kumar Sent Legal Notice Of Rs 25 Crore To Paresh Rawal) आहे. अशातच प्रत्येकजण काळजीत आहे की, परेश रावल यांनी सिनेमा अर्ध्यातच का सोडला? त्यांनी असा तडकाफडकी निर्णय का घेतला? 

दरम्यान, परेश रावल यांची एक मुलाखत समोर आली आहे. यामध्ये परेश रावल यांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. परेश रावल यांनी सांगितलं की, ते हेरा फेरी चित्रपट आणि त्यातील बाबूरावच्या भूमिकेवर खूश नाहीत. त्यांना या भूमिकेमध्ये अडकल्यासारखं वाटतंय. या मुलाखतीत बोलताना परेश रावल यांनी स्पष्ट केलंय की, त्यांना हे पात्र आणि चित्रपट अजिबात करायचा नाही. 

"तो चित्रपट म्हणजे, गळ्यातला फास"

परेश रावल यांनी लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "तो चित्रपट म्हणजे, गळ्यातील फास आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तुमचा विश्वास बसणार नाही. मी कोणालाही सांगितलेलं नाही. मी 2007 मध्ये विशाल भारद्वाजकडे गेलो होतो. हेरा फेरीचा दुसरा भाग 2006 मध्येच प्रदर्शित झालेला. मी विशालला म्हटलं की, माझ्याकडे एक फिल्म आहे, मला त्यातल्या माझ्या भूमिकेपासून सुटका करुन हवीय. सेम गेटअपमध्ये वेगळ्या प्रकारची भूमिका तुम्ही मला देऊ शकता. जो कुणी येतोय, त्याच्या मनात हेरा फेरीच बसलेला आहे. मी अभिनेता आहे. मला दलदलीत अडकायचं नाही. पण, विशाल मला म्हणाला की, मी रिमेक करत नाही." 

परेश रावल पुढे बोलताना म्हणाले की, "मग मी 2022 मध्ये आर. बाल्की यांच्याकडे गेलो आणि त्यांनाही तेच सांगितलं. मला त्या भूमिकेत गुदमरल्यासारखं वाटतंय. आनंद मिळतोच, पण खूपच बांधल्यासारखं वाटतं. मला यातून मुक्ती हवीय. मग जेव्हा तुम्ही एकामागून एक सीक्वेल बनवता, तेव्हा तुम्ही तेच बनवता. तुम्ही वेगळ्या दिशेनं जात नाही. हे एक 500 कोटींच्या गुडविल वालं कॅरेक्टर आहे, त्याच्यासोबत उड्डाण भरा. पण ते कोणालाच करायचं नाही. तुम्हाला असं वाटत असेल की, तुम्ही ते करू शकत नाही, तर प्रकल्प अडकेल. पण आनंद मिळणार नाही." 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

'हेरा फेरी 3' अर्ध्यात सोडल्यामुळे परेश रावल यांच्या अडचणी वाढणार? अक्षय कुमारनं धाडली 25 कोटींची लीगल नोटीस