Pankaj Tripathi: बॉलिवूडचा बहुप्रतिभावान अभिनेता पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे, पण यावेळी कारण आहे त्याचा भन्नाट नवा लूक! नेहमी साधेपणात दिसणाऱ्या ‘कालीन भैय्या’ने यावेळी पारंपरिक पोशाखात मॉडर्न फॅशनचा टच देत सर्वांना थक्क केलं आहे. पंकजने स्वतः या नव्या फोटोंची झलक आपल्या सोशल मीडियावर शेअर केली असून, त्याचा अंदाज पाहून चाहतेच नव्हे तर रणवीर सिंगसारखे बॉलिवूडचे स्टार्सही थक्क झाले आहेत.
पंकज त्रिपाठीचा हटके लूक
फोटोंमध्ये पंकजने डार्क ग्रीन रंगाची मखमली शेरवानी जॅकेट परिधान केली आहे, ज्यावर बारीक सोन्याच्या धाग्यांनी नक्षीकाम केलेलं आहे. त्यासोबत त्याने काळ्या रंगाचा एम्ब्रॉइडरी शर्ट आणि लाल सलवार घातली आहे. या पारंपरिक लूकला आधुनिक टच देण्यासाठी पंकजने हिरव्या रंगाचा लांब ब्लेझर आणि टोपीदेखील घातली आहे. हा संपूर्ण गेटअप त्याच्या व्यक्तिमत्त्वाला अगदी हटके आणि ग्लॅमरस लुक देतोय. या नव्या लूकसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे - “एक नवी सुरुवात... काहीतरी रोमांचक येतंय. तुम्हाला ही वाइब कशी वाटली?”
रणवीर सिंगची मजेशीर कमेंट
पंकजचा हा लूक पाहून इंटरनेटवर चाहत्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडतोय. पण सगळ्यात लक्षवेधी कमेंट होती रणवीर सिंगची. आपल्या अतरंगी फॅशनसाठी ओळखला जाणारा रणवीर सिंग पंकजचा लूक पाहून म्हणाला – “Arre!😍 yeh kya, Guruji ?! Hum sudhar gaye, aur aap bigad gaye?” तर अभिनेता गुलशन देवैयाने मजेशीर अंदाजात लिहिलं “ओए पंकी!! पंकी ओए सर सर सर सर सर!” तर गायिका हर्षदीप कौर म्हणाली, “ओहू, काय बात!”
पंकज त्रिपाठीचे आगामी प्रोजेक्ट कोणते?
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर पंकज त्रिपाठी नुकताच दिग्दर्शक अनुराग बसूच्या ‘मेट्रो इन द दिनो’ या चित्रपटात दिसला होता, ज्यात त्याने कोंकणा सेन शर्मासोबत काम केलं. या चित्रपटात अनुपम खेर, नीना गुप्ता, आदित्य रॉय कपूर, सारा अली खान, अली फझल आणि फातिमा सना शेखही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये होते. याशिवाय तो ‘क्रिमिनल जस्टिस’ च्या चौथ्या सिझनमध्ये दिसला होता. आता लवकरच पंकज त्रिपाठी ‘मिर्झापूर’ च्या पुढील भागात आणि ‘पारिवारिक मनोरंजन’ या चित्रपटात अभिनेत्री अदिती राव हैदरीसोबत झळकणार आहे.