Pandharichi Wari Movie :  मराठी संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा म्हणजे पंढरपूरची वारी. दरवर्षी असंख्य वारकरी आपल्या श्रद्धेच्या बळावर पायी प्रवास करत विठोबा आणि माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचतात. याच अनोख्या परंपरेवर आधारित पंढरीची वारी या चित्रपटाची मांडणी निर्मात्यांनी खूपच भावनिक आणि प्रभावी पद्धतीने करण्यात आली होती. या चित्रपटात वारीचा अध्यात्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक पैलू रसिकांसमोर उलगडला जातो. 1988 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा आजही आषाढी एकादशीच्या निमित्ताने दूरदर्शन चॅनेल्सवर प्रसारित होतो आणि प्रेक्षक तो आवर्जून पाहतात.

Continues below advertisement

पंढरीची वारी या चित्रपटाच्या शूटिंगच्या काळात संपूर्ण टीमला मोठ्या आर्थिक आणि मानसिक संकटांचा सामना करावा लागला होता. या चित्रपटाचं चित्रीकरण प्रत्यक्ष आळंदी ते पंढरपूरच्या वारीदरम्यान केलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्यातसुद्धा शूटिंग करण्यात आलं. एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? बाळ धुरी यांच्याआधी ही महत्वाची भूमिका अभिनेता अरुण सरनाईक साकारणार होते. परंतु चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे ही भूमिका अर्धवट राहिली.

वारीचं वास्तव चित्रण टिपता यावं आणि वेळेची बचत व्हावी, म्हणून श्रीकांत मोधे यांना त्या भूमिकेसाठी विचारण्यात आलं. त्यांनी सुरुवातीला संमती दिली होती, पण काही कारणास्तव नंतर त्यांनी ती भूमिका नाकारली. त्यानंतर ही जबाबदारी बाळ धुरी यांनी पेलली.

Continues below advertisement

रंजना देशमुख यांच्याऐवजी जयश्री गडकर यांची निवड

चित्रपटात जयश्री गडकर यांनी साकारलेली भूमिका मूळतः रंजना देशमुख यांच्यासाठी ठरवलेली होती. पण चित्रपटाचं सुमारे ७० टक्के चित्रीकरण झाल्यानंतर रंजना देशमुख यांचा एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आणि त्यांना चालणंही अशक्य झालं.

निर्मात्यांनी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होईल या आशेने तब्बल तीन वर्षे प्रतीक्षा केली, पण अपेक्षेप्रमाणे काही घडलं नाही. अखेर या भूमिकेसाठी जयश्री गडकर यांची निवड करण्यात आली आणि चित्रपट पुन्हा शूट करण्यात आला.

मोठ्या आर्थिक नुकसानातून उभारलेला चित्रपट

या साऱ्या त्रासामुळे आणि पुन्हा शूटिंग केल्यामुळे निर्मात्यांना जवळपास १८ लाख रुपयांचं नुकसान सहन करावं लागलं. तरीही चित्रपटाचे निर्माता अण्णासाहेब घाटगे आणि दिग्दर्शक रमाकांत कवठेकर यांनी परिस्थितीला हार मानली नाही. त्यांनी ठाम निर्धाराने चित्रपट पूर्ण केला. प्रचंड अडचणी, आर्थिक तोटं आणि कलाकार बदलूनही पंढरीची वारी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांच्या प्रेमामुळे तो यशस्वीही ठरला!

या चित्रपटात कोणत्या कलाकारांनी कोणत्या भूमिका साकारल्या, त्यातली प्रमुख अभिनेत्री कोण होती आणि विठोबाची भूमिका करणारा बालकलाकार कोण होता, हे जाणून घेऊ.

नंदिनी जोग यांनी साकारलेली ‘मुक्ता’

‘पंढरीची वारी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन रामकांत कवठेकर यांनी केले होते. चित्रपटात त्यांनी एका निष्पाप आणि भक्तिमय मनाच्या वारकऱ्याच्या मुलीची भूमिका अभिनेत्री नंदिनी जोग यांच्याकडून साकारून घेतली होती. तिचं पात्र ‘मुक्ता’ या नावाने ओळखलं गेलं. मराठी चित्रपटसृष्टीत नंदिनी जोग यांनी अनेक भूमिका साकारल्या आहेत, पण या चित्रपटातील त्यांची भूमिका आजही विशेष लक्षात राहते. मूळच्या अकोला जिल्ह्याच्या रहिवासी असलेल्या नंदिनी जोग सध्या सिनेसृष्टीपासून दूर असून लग्नानंतर त्या पुण्यात स्थायिक झाल्या आहेत.

विठोबाच्या भूमिकेत बकुल कवठेकर

या चित्रपटातील एक लहानसा, मुक मुलगा शेवटी विठोबाच्या रूपात समोर येतो आणि आपला सहजसुंदर अभिनय प्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. या पात्रात काम करणारा बालकलाकार होता — बकुल कवठेकर. तो दिग्दर्शक रामकांत कवठेकर यांचा मुलगा होता. दुर्दैवाने, शिक्षणासाठी पुण्यात असताना 2002 मध्ये त्याचं निधन झालं.

बाळ धुरी यांची ‘अण्णा’ म्हणून भूमिका

अण्णा हे पात्र म्हणजे एक समर्पित वारकरी, आपल्या गावातील एक आदर्श व्यक्ती आणि कुटुंबप्रमुख. हे पात्र बाळ धुरी यांनी प्रभावीपणे रंगवले होते. मुळात ही भूमिका अरुण सरनाईक यांना दिली गेली होती, पण चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या अपघाती निधनामुळे बाळ धुरी यांनी ती जबाबदारी घेतली.

‘आक्कासाहेब’च्या भूमिकेत जयश्री गडकर

अण्णांची पत्नी, बोलकी स्वभावाची आणि विठोबावर थोडा राग धरणारी ही व्यक्तिरेखा जयश्री गडकर यांनी साकारली होती. मूळात ही भूमिका रंजना देशमुख यांच्याकडे होती, पण त्यांच्या अपघातामुळे पायाला इजा झाल्यानंतर जयश्री गडकर यांना ती भूमिका दिली गेली.

अशोक सराफ यांची ‘सदा’ ही भूमिका – एक चोर

गावातील एक चोरट्या स्वभावाचा माणूस, जो वारीच्या प्रवासात चोरीच्या उद्देशाने सहभागी होतो – ही व्यक्तिरेखा अशोक सराफ यांनी साकारली.

राजा गोसावी – नानाची साथ

सदाचा साथीदार आणि गावातला दुसरा चोर या भूमिकेत राजा गोसावी दिसतो. तोसुद्धा वारीमध्ये चोरीसाठी सहभागी होतो.

राघवेंद्र काडकोळ – तिसरा साथीदार ‘गणा’

सदा आणि नानाच्या जोडीला तिसरा साथीदार गणा – ही भूमिका राघवेंद्र काडकोळ यांनी साकारली.

वारीचं प्रतिबिंब आणि जीवनमूल्यांचा ठसा

पंढरीची वारी या चित्रपटामध्ये वारकरी संप्रदायाच्या जीवनशैलीचा आणि मूल्यांचा नेमका वेध घेण्यात आला आहे. एक साधा ग्रामीण वारकरी, जो दरवर्षी पंढरपूरला वारी करतो, त्याच्या जीवनातील संघर्ष, श्रद्धा, कुटुंबीयांशी असलेले नाते, गावकऱ्यांशी जोडलेली नाळ आणि वारीमुळे घडणारा आत्मिक बदल या सर्व गोष्टी या चित्रपटातून समोर येतात.

वारीच्या प्रवासात येणाऱ्या अडथळ्यांचा, पावसात चिंब भिजूनही “माऊली माऊली” म्हणत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या निष्ठेचा, त्यांच्यातील प्रेमभावनेचा आणि बंधुभावाचा भावस्पर्शी चित्रण या सिनेमात आहे. या चित्रपटात महाराष्ट्राच्या मातीतून घडलेल्या कुशल कलाकारांनी अभिनय केला असून प्रत्येक भूमिकेला त्यांनी जीव ओतलेला आहे. दिग्दर्शकाने वारीचा सखोल अभ्यास करून तिचं  चित्रण सिनेमात केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना वारीचा अनुभव खऱ्याखुऱ्या स्वरूपात समजतो आणि मनापासून भावतो.