Palash Muchhal Controversy: स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छल पुन्हा गोत्यात, गंभीर प्रकरणी सांगलीत गुन्हा दाखल; स्मृतीच्या मित्राकडून 25 लाख घेतले अन्...
Palash Muchhal Controversy: संगीतकार आणि सिनेनिर्माता पलाश मुच्छल याच्याविरोधात महाराष्ट्रातील सांगली इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Palash Muchhal Controversy: बॉलिवूडचा (Bollywood News) सुप्रसिद्ध संगीतकार आणि सिनेनिर्माता पलाश मुच्छल (Palash Muchhal) आणि टीम इंडियाची (Team India) स्टार क्रिकेटर स्मृती मानधना (Smriti Mandhana) यांचं लग्न ठरलेलं. पण, लग्नाच्या आदल्या रात्री काहीतरी घडलं आणि दोघांचं लग्न मोडलं. तेव्हापासूनच दोघेही या ना त्या कारणानं चर्चेत असतात. स्मृतीसोबत लग्न मोडल्यानंतर पलाशवर अनेक आरोप करण्यात आले. त्यानं स्मृतीला फसवल्यापासून असंख्य आरोप त्यावर झाले, त्यामुळे त्याच्याभोवतीच्या अडचणी काहीशा वाढलेल्या. अशातच आता पुन्हा एकदा पलाश मुच्छलच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पलाश मुच्छल कायदेशीर कचाट्यात अडकला असून त्याच्या कायदेशीर अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात पलाश मुच्छल याच्यावर ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल (Case Registered Against Palash Muchhal Under Atrocities Act) करण्यात आला आहे.
संगीतकार आणि सिनेनिर्माता पलाश मुच्छल याच्याविरोधात महाराष्ट्रातील सांगली इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ही तक्रार भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना हिचा बालमित्र विज्ञान प्रकाश माने यानं दाखल केली आहे. पलाश मुच्छल यांच्यावर जातिवाचक शब्दांचा वापर केल्याचा तसेच फसवणुकीचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 22 नोव्हेंबर रोजी सांगली-आष्टा रोडवरील टोल प्लाझा परिसरात घडली. तक्रारदार विज्ञान माने यांच्या म्हणण्यानुसार, वादावादीदरम्यान पलाश मुच्छल यांनी त्यांच्याविरुद्ध अपमानास्पद आणि जातिवाचक वक्तव्य केलं. या प्रकरणी पोलिसांनी एससी/एसटी कायद्याच्या कलम 3(1) सोबतच भारतीय न्याय संहितेच्या कलम 351(2) आणि 352 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
प्रकरण नेमकं काय? (Case Registered Against Palash Muchhal)
पलाश मु्च्छल विरोधात तक्रार दाखल करणारा विज्ञान माने हा सांगलीतलाच अभिनेता आणि निर्माता आहे. पलाश मु्च्छलनं 'नजरिया' सिनेमाच्या निर्मितीसाठी विज्ञान माने याच्याकडून 25 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. तसेच, पैसे घेताना त्यानं सहा महिन्यात सिनेमा पूर्ण करण्याचं आश्वास दिलेलं. पण, बराच काळ लोटला तरीसुद्धा सिनेमा पूर्ण न झाल्यानं तक्रारदार विज्ञान माने यानं पैसे परत मागितले. पण, पैसे मिळाले नाहीत. याच मुद्द्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच हा प्रकार घडल्याचं समोर आले आहे. विज्ञान माने यानं सांगली शहर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गतही फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदाराचं म्हणणं काय?
विज्ञान माने यानं याप्रकरणाबाबत माध्यमांशी बोलताना आपली बाजू मांडली. त्यानं आरोप केलाय की, पलाश मुच्छल यानं आपल्याला सिनेमा लवकर पूर्ण होईल, असा विश्वास दिलेला. पण, प्रत्यक्षात त्यांनी फसवणूक केलीय. "मी पैसे परत मागितल्यावर तो सतत टाळाटाळ करू लागला. मी याबाबत जाब विचारला असता, त्यानं अत्यंत शिवराळ आणि अपमानास्पद भाषा वापरली. ते शब्द कॅमेऱ्यासमोरही सांगता येणार नाहीत. त्याचे वर्तन अतिशय त्रासदायक होतं...", असंही त्यांनं सांगितलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :





















