Marathi Play : सध्या नव्या नाटकांतून विषयांचं वैविध्य रंगभूमीवर पाहायला मिळत आहे. नाट्यगृहांवर लागणाऱ्या नाटकांच्या पाट्यांकडे नजर टाकली, तर नाटकांची नवी नावेही रसिकांचं लक्ष वेधून घेत आहे. त्यातच आता हटके शीर्षक असलेलं सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' (Pahile na Me Tula) हे नवंकोर नाटक रंगभूमीवर येणार आहे. या नाटकाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही सुनिल हरिश्चंद्र यांनी सांभाळली आहे.
‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणणार आहे. तसेच सुमुख चित्र’ संस्थेच्या माध्यामातून आगामी काळात अनेक चांगले सामाजिक विषय नाटकांच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर केले जातील. नवोदित कलाकार, लेखक-दिग्दर्शक यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे.
नाटकाचा मुहूर्त संपन्न
सध्या जमाना ‘फिल्टर’चा आहे. एखादी गोष्ट अधिक छान असावी यासाठी 'फिल्टर’ चा वापर केला जातो. नवे नाते निर्माण करताना किंवा असलेले नाते जपताना महत्त्वाचा असेलला ‘फिल्टर’ अर्थात, दृष्टिकोन व विश्वास आपण जाणीवपूर्वक निर्माण करतो का ? योग्यवेळी तो वापरतो का? हे बघणं ही तितकंच आवश्यक असतं हे दाखवणाऱ्या ‘पाहिले न मी तुला’ या नाटकाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. या मुहूर्त प्रसंगी निर्माते प्रसाद कांबळी, अजय विचारे ही मान्यवर मंडळी उपस्थित होती. अंशुमन विचारे, हेमंत पाटील , सुवेधा देसाई या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.
नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे असून संगीत निनाद म्हैसळकर यांचे आहे. प्रकाशयोजननेची जबाबदारी राजेश शिंदे यांनी सांभाळली आहे. वेशभूषा वरदा सहस्त्रबुद्धे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे अरविंद घोसाळकर व प्रसाद सावर्डेकर यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली आहे.