Marathi Play : येत्या 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections 2024) मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा हक्क हा प्रत्येक नागरिकाला संविधानात मिळालेला मुलभूत हक्क आहे. त्यामुळे प्रत्येकाने हा हक्क बजावलाच पाहिजे, असं आवाहन केलं जातं. याचसाठी आता एका मराठी नाटकानेही (Marathi Play) पुढाकार घेतला आहे.
अंशुमन विचारेच्या 'पाहिले न मी तुला' या नाटाकाने त्यांच्या तिकीटावर 50 टक्क्यांची सवलत दिली आहे. तसेच ही सवलत फक्त तिकीट खिडक्यांवरच उपलब्ध असल्याचं नाटकाच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे. नाटकातील मुख्य कलाकारांनी या संदर्भात एक व्हिडीओ शेअर करत माहिती दिली आहे. या नाटकाचा 20 नोव्हेंबर रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहात 25वा प्रयोग संपन्न होणार आहे. त्याचनिमित्ताने आणि मतदानाचं औचित्य साधून ही विशेष सवलत नाटकाच्या निर्मात्यांनी देण्याचा निर्णय घेतला आहे.
नाटकाच्या टीमने शेअर केला व्हिडीओ
नाटकाच्या टीमने एक व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, मंडळी 20 नोव्हेंबरला मतदान आहे. मतदान म्हणजे लोकशाही बळकट करण्याचा आपला अधिकार आणि त्याच 20 नोव्हेंबरला आमच्या पाहिले न मी तुला नाटकाचा रौप्य महोत्सवी म्हणजे 25 वा प्रयोग होणार आहे. त्याच दिवशी तुम्ही मतदानही करणार आहात. ती मतदान केल्याची खूण तुम्ही आमच्या तिकीट खिडकीवर दाखवलीत, तर तुम्हाला तिकीटावर 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. ही सवलत फक्त त्या दिवशी आणि तिकीट खिडकीवरच आहे, ऑनलाईन नाही. तेव्हा 20 नोव्हेंबरला तुम्ही मतदान करा आणि आमच्या नाटकाला या.
आपल्यातील सळसळत्या ऊर्जेचं दर्शन घडवत कोकणाचा ‘झिल’ अंशुमन विचारे (Anshuman Vichare) जळगावचा ‘जाळंधुर’ लेक हेमंत पाटील (Hemant Patil) या दोन्ही अतरंगी कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने आजवर रसिकांचं मनोरंजन केलं. आता 'पाहिले न मी तुला' या नाटकातून हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसत आहेत. सुमुख चित्र आणि अनामिका प्रस्तुत ‘पाहिले न मी तुला' हे नवंकोर नाटक रंगभूमीवर दाखल झालंय.लेखक-दिग्दर्शक सुनिल हरिश्चंद्र यांनी नात्याच्या बाबतीत घडणाऱ्या गोष्टीचा वेध यातून घेतला आहे. ‘सुमुख चित्र’ ही निर्मिती संस्था आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज् च्या सहकार्याने अनेक नव्या नाट्यकृती रंगभूंमीवर आणलीये.