Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय. हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झालाय. यात  डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झालाय. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालाय.

पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झालाय.  तर महाराष्ट्रातले एस बालचंद्रू, सुबोध पाटील, शोबीत पटेल हल्ल्यात जखमी झालेत. पर्यटकांवर करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यानंतर सर्वजण संतापले आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटीही या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आहेत. अशातच आता खासदार अभिनेत्री कंगना रनौतनंही हल्ल्यावर संताप व्यक्त केला आहे. 

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे सर्वजण संतापले आहेत. बॉलिवूड आणि टीव्ही सेलिब्रिटी निषेध व्यक्त करत आहेत. अशातच आता अभिनेत्री कंगना रनौतनंही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे. कंगनानं लिहिलंय की, दहशतवाद्यांनी नि:शस्त्र लोकांवर गोळीबार केला. अशा भित्र्या लोकांशी कसं लढायचं?

कंगना रानौतची पोस्ट 

कंगना रानौतनं पहलगाम हल्ल्याबाबत दोन पोस्ट पोस्ट केल्या आहेत. एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय की, 'दहशतवादाचा एक धर्म असतो आणि पीडितांचाही असतो...' दुसऱ्या पोस्टमध्ये तिनं एक व्हिडीओ शेअर केलाय आणि त्यामध्ये लिहिलंय की, "त्यांनी अशा लोकांवर गोळ्या झाडल्यात, ज्यांच्या हातात स्वतःचं रक्षण करण्यासाठी काहीही नव्हतं. इतिहासातील प्रत्येक युद्ध युद्धभूमीवर लढलं गेलंय. जेव्हापासून या नपुंसक लोकांकडे शस्त्रं आलीत, तेव्हापासून ते सामान्य आणि निष्पाप लोकांवर गोळ्या झाडतायत. युद्धभूमीबाहेर लढू इच्छिणाऱ्या या भित्र्यांशी कसं लढायचं?"

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अनुपम खेर भावुक 

पहलगाम हल्ल्यावर अभिनेते अनुपम खेर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर खूप भावनिक दिसत होते. ते म्हणाले की, "पहलगाममध्ये हिंदूंची कत्तल करण्यात आली. हिंदूंना निवडकपणे मारण्यात आलं. मन दुःखी आणि रागानं भरलेलंय. मी काश्मिरी हिंदूंसोबतही हे घडताना पाहिलंय. लोकांना त्यांच्या धर्माबद्दल विचारणं आणि नंतर त्यांना मारणं... याबद्दल मी काय बोलू, माझ्याकडे शब्द नाहीत."

दरम्यान, अक्षय कुमार, रणदीप हुड्डा, स्वरा भास्कर, विक्की कौशल, आलिया भट्ट, करीना कपूर यांसारख्या स्टार्सनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला आहे. अभिनेता सुधांशू पांडे यानं बदला घेण्याची मागणी केली आहे. तसेच, अभिनेत्री देवोलीना भट्टाचार्य हिनंही अनेक प्रश्न विचारले आहेत.