Padma Shri Ashok Saraf Video: महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) अशोक सराफ (Ashok Saraf) यांना भारत सरकारकडून (Government of India) 'पद्मश्री' पुरस्कार (Padma Shri Award) प्रदान करण्यात आला. त्यानंतर मराठी रसिक प्रेक्षकांचा ऊर अभिमानानं भरून आला. पण, यासर्व घडामोडींमध्ये अशोक सराफांना एक भावूक करणारा अनुभव आला आहे. ज्यामुळे अशोक सराफांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.
'महाराष्ट्र भूषण' अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मंगळवारी, 27 मे रोजी नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात खास सन्मान करण्यात आला. राष्ट्रपतींच्या हस्ते भारतातील 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले. या कार्यक्रमात अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आलं. वेळी त्यांच्यासह त्यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ आणि कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते.पुरस्कार स्विकारल्यानंतर अशोक सराफ दिल्लीहून मुंबईला रवाना झाले, त्याचवेळी त्यांनी एक गोड क्षण अनुभवला.
अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची भाची अदिती परांजपे पायलट आहे. अशोक सराफ ज्या फ्लाईटनं मुंबईला परतत होते, अदिती नेमकी त्याच फ्लाईटची फ्लाइट कॅप्टन होती. यावेळी तिनं अशोक सराफ यांच्या झालेल्या सन्मानाबद्दल विमानात खास अनाउन्समेंट केली.
अदिती परांजपे म्हणाली की, "एक खूपच खास, भावनिक आणि आयुष्यात एकदाच घडणारं असं उड्डाण. अशोक काकांसोबत उड्डाण करता आलं ही खूपच अभिमानाची गोष्ट आहे. तुमचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन."
"आजचा विमानप्रवास माझ्यासाठी खरंच खूप खास आहे कारण, माझे काका अशोक सराफ आपल्यासोबत या विमानातून प्रवास करत आहेत, ज्यांना अलिकडेच भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. मला खूप अभिमान वाटतोय की, मी आज त्यांना दिल्ली ते मुंबई असा प्रवास घडवणार आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करते की, प्लीज जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन करा आणि त्यांचे स्वागत करा.", असं अशोक सराफांची भाची अदिती परांजपेनं विमानात अनाउन्समेंट केली.
अदितीच्या अनाउन्समेंटनंतर फ्लाईटमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला आणि अशोक सराफ यांनी हात जोडून सर्वांचे आभार मानले. हा व्हिडीओ अशोक सराफ यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर शेअर केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
