Padma Awards 2026: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला केंद्र सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 5 जणांना पद्मविभूषण, 13 जणांना पद्मभूषण आणि 114 दिग्गजांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात येणार आहे. या यादीतील प्रमुख नावांमध्ये दिवंगत बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र सिंह देओल यांच्या नावाचा समावेश आहे. त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण प्रदान करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे, झारखंड राज्याच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते शिबू सोरेन यांना मरणोत्तर पद्मभूषण प्रदान करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे आपल्या सुमधुर आवाजाने प्रत्येकाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अल्का याज्ञिक यांनाही पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. यामुळे चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर
दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना कला क्षेत्रासाठी मरणोत्तर पद्मविभूषणने गौरवण्यात येणार आहे. 24 नोव्हेंबर 2025 रोजी धर्मेंद्र यांचे निधन झाले होते. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. त्यांती बॉलिवूडमध्ये 'ही मॅन' अशी ओळख होती. अनेक दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीवर अधिराज्य गाजवले. त्यांच्या निधनानंतर एका पर्वाचा अंत झाला, असं म्हटलं जात आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर आज त्यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तर, दिग्गज जाहिरातदार पीयूष पांडे यांना मरणोत्तर पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. तसेच, गायिका अल्का याज्ञिक यांना पद्म भूषण पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
बॉलिवूडचे कलाकार माधवन रंगनाथन यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील मातीतील कलाकारांनाही पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. रघूवीर खेडकर, भिकल्या लाडक्या धिंडा यांनाही पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील कलाकारांना पद्मपुरस्कार जाहीर होताच, कला विश्वातून आनंद व्यक्त केला जात आहे.
बॉलिवूडसह इतर सिनेसृष्टीतील कलाकारांनाही पद्म पुरस्काराचा मान मिळणार आहे. साऊथ सुपरस्टार मामुटी यांना पद्म भूषणच्या यादीत नाव आहे, त्यांचाही सत्कार होणार आहे. तर, लेखक शतावधानी आर. गणेश यांचाही पद्मभूषण या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. तर, सामाजिक कार्यासाठी केरळचे माजी मुख्यमंत्री व्ही.एस. अच्युतानंदन यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
'तमाशा लोककलेला पहिलाच पद्म पुरस्कार'; भारत सरकारकडून पद्मश्री जाहीर होताच रघुवीर खेडकर भावुक
