OTT Upcoming Thriller: सध्या ओटीटीवर नव्या वेबसीरिज आणि सिनेमांची अक्षरशः लाट आली आहे. दर आठवड्याला ओटीटीवर काही ना काही नवीन रिलीज होत असतंच. आता लवकरच Prime Video वर एक नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे, या सिनेमाची निर्मिती ‘पाताल लोक’च्या मेकर्सनी केली आहे. नुकतीच या सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

Continues below advertisement

ओटीटीवर धडकणार नवा सिनेमा

होय, नुकताच Prime Original फिल्म ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ (Babita Singh Reporting) ची दमदार घोषणा करण्यात आली आहे. ओटीटीवर येणाऱ्या या सिनेमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. आता नुकताच या सिनेमाचा फर्स्ट लूक पोस्टर रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच सिनेमाच्या रिलीज डेटचीही घोषणा करण्यात आली आहे.

Continues below advertisement

हा सिनेमा थ्रिलर इन्व्हेस्टिगेटिव्ह ड्रामा असणार आहे. अंबिका पंडित यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, अमिता व्यास यांनी लेखन केलं आहे. स्क्वाड प्रोडक्शन्सने एक्ट थ्रीसोबत मिळून सौरभ मल्होत्रा, मनुज मित्तरा आणि टीना थरवानी यांच्या निर्मितीत हा सिनेमा साकारला आहे.

या सिनेमात निमिषा सजयन, बरुण सोबती आणि अंशुमान पुष्कर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. नुकत्याच समोर आलेल्या फर्स्ट लूकमध्येही सिनेमाची मुख्य स्टारकास्ट पाहायला मिळत आहे.

काय आहे सिनेमाची कथा?

‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ची कथा निलंबित पोलीस अधिकारी बबिताभोवती फिरते. तिला प्रेमाने बेबी या नावाने ओळखलं जातं. या भूमिकेत अभिनेत्री निमिषा सजयन दिसणार आहे.

बबिताने आपल्या आयुष्यातील बराचसा काळ इतरांना आनंदी ठेवण्यात आणि त्यांच्या गरजा स्वतःपेक्षा आधी पूर्ण करण्यात घालवला आहे. मात्र, तिच्या आयुष्यात अचानक एक धक्कादायक घटना घडते.

बबिताच्या बालपणीच्या एका मित्राची हत्या होते. या घटनेने ती पूर्णपणे हादरून जाते. आपल्या मित्राच्या मृत्यूमागचं सत्य जाणून घेण्यासाठी ती स्वतः या प्रकरणाचा तपास करण्याचा निर्णय घेते.

सत्याच्या शोधात निघालेल्या बबिताला या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या तपासादरम्यान तिच्यासमोर कोणती रहस्यं उलगडतात आणि ती आपल्या मित्राच्या हत्येचं सत्य शोधू शकते का, हे सिनेमाच्या प्रदर्शनानंतरच समोर येईल.

28 ऑगस्टला Prime Video वर होणार प्रीमियर

‘बबिता सिंह रिपोर्टिंग’चा प्रीमियर 28 ऑगस्ट रोजी Prime Video वर होणार आहे. भारतासह जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये हा सिनेमा हिंदी आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

‘पाताल लोक’सारख्या चर्चेत राहिलेल्या प्रोजेक्टच्या मेकर्सकडून हा नवा इन्व्हेस्टिगेटिव्ह थ्रिलर प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने सिनेमाबद्दल उत्सुकता वाढली आहे. आता ‘बबिता सिंह रिपोर्टिंग’ प्रेक्षकांचं किती लक्ष वेधून घेतो आणि ‘पाताल लोक’च्या मेकर्सची ही नवी निर्मिती किती प्रभाव पाडते, हे 28 ऑगस्टनंतरच कळेल.