मुंबई : अकॅडमी अॅवॉर्डस अर्थात ऑस्कर पुरस्कारांची लगबग आता सुरू झाली आहे. कोरोनाचा फटका जसा अमेरिकेला बसला तसा तो त्यातल्या हॉलिवूडलाही बसला. चित्रपटांची चित्रिकरणं थांबली. रिलीजच्या तारखा पुढे गेल्या. याचा थेट पहिणाम ऑस्कर सोहळ्यावर झाला. म्हणूनच ऑस्करचं कामही थांबलं. आता या सोहळ्याची नवी तारीख जाहीर झाली आहे.

ऑस्कर अकादमीच्या ऑफिशिअल ट्विटर हॅंडलवरून ही माहिती दिली गेली आहे. छोटेखानी वेळापत्रकच यात शेअर करण्यात आलं आहे. या वेळापत्रकानुसार ऑस्करच्या शर्यतीत उतरायचं असेल तर 1 जानेवारी 2021 सिनेमांची एन्ट्री पाठवावी लागणार आहे. त्यानंतर सर्व सिनेमांच्या कागदपत्रांची छाननी करून या स्पर्धेला पात्र असलेल्या सिनेमांची अंतिम यादी 9 फेब्रुवारीला येईल. ऑस्करची नामांकनं जाहीर होणार आहेत 15 मार्च 2021 ला. आणि अंतिम सोहळा 25 एप्रिल 2021 पार पडणार आहे.


दरवर्षी ऑस्कर पुरस्कारांकडे संपूर्ण जगातल्या सिनेविश्वाचं लक्ष लागून राहिलेलं असतं. जगभरातले उत्तमोत्तम सिनेमे या स्पर्धेत येतात आणि त्यातून ज्युरी उत्तम सिनेमे निवडतात. वेगवेगळ्या विभागांत उत्तम सिनेमांची निर्मिती होते. यंदाचं या स्पर्धेचं 93 वं वर्षं आहे. दरवर्षी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हा सोहळा होत असतो. पण यंदा कोरोनामुळे यात जवळपास तीन महिन्यांची गॅप पडली. या काळात अमेरिकेसह संपूर्ण जगात कोरोनानं हाहाकार उडवल्यामुळे मार्च ते जून या काळात सर्वच जगभरात सिनेमाचं प्रदर्शन, चित्रीकरण थांबलं होतं. त्यामुळे सिनेमे रिलीजच झाले नाहीत. त्यामुळे ऑस्करची तयारीही लांबली. आता हे पुरस्कार 25 एप्रिलला होणार आहे. म्हणूनच येत्या काळात जगभरात उत्तमोत्तम सिनेमे प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

भारतातर्फे यंदा ऑस्करसाठी कोण जाईल याचीही चाचपणी केली जातेय. त्याबद्दलही समिती सर्व सिनेमे पाहून भारतातर्फे अधिकृत प्रवेश भरला जातो. यंदा डिसायपल या चित्रपटाकडून तशी अपेक्षा बाळगली जातेय. डिसायपल हा चैतन्य ताम्हाणेचा चित्रपट असून त्याने यापूर्वी कोर्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.