Maharashtrachi Hasyajatra Fame Onkar Raut Share Fans Incident: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) टेलिव्हिजनवरचा (Television Show) अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम सध्या घराघरांत पोहोचला आहे. या कार्यक्रमाला आणि त्यात झळकणाऱ्या कलाकारांना अल्पावधीतच मोठी पसंती मिळालीय. आजही लोक या कलाकारांचे स्किट्स पाहून पोट धरुन हसतात आणि आपल्या आयुष्यातली दुःख विसरतात. या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. यापैकी अनेक कलाकारांना हास्यजत्रेमुळे इतरही अनेक मोठे प्रोजेक्ट्स मिळालेत. तसेच, या कलाकारांच्या फॅन फॉलोइंगमध्येही वाढ झाली आहे. याचेच काही किस्से हास्यजत्रेतील काही कलाकारांनी अनेकदा शेअर केलेत. तसेच, या कलाकारांचे स्किट्स खरंच चाहत्यांच्या टेन्शनवर औषध असल्याचंही अनेकांनी सांगितलंय. असाच एक मनाला चटका लावून जाणारा अनुभव 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात झळकणाऱ्या ओंकार राऊत (Onkar Raut) यानं शेअर केला आहे.
ओंकार राऊत यानं नुकतीच 'महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन'ला मुलाखती दिली. या मुलाखतीत बोलताना त्यानं काळजाचा ठाव घेणारा एक किस्सा सांगितला. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमामुळे अर्धांगवायु होऊन अंथरुणाला खिळलेल्या एका प्रेक्षकाला जीवनदान मिळालंय, याचा किस्सा सांगितला.
ओंकार राऊत नेमकं काय म्हणाला? (Onkar Raut On Maharashtrachi Hasyajatra)
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधला घराघरांत पोहोचलेला विनोदवीर ओंकार राऊत म्हणाला की, "एक दिवस मी खाली दुकानात सामान आणायला गेलेलो. त्या दुकानात जवळपास 55 वर्षांचा एक माणूस आला. त्यानं डायरेक्ट येऊन माझे पायच धरले... मी घाबरलो आणि विचारलं, "अहो काका तुम्ही हे काय करताय...?" त्यानं मला मिठी मारली आणि परत खुर्चीवर जाऊन बसला. तो मला म्हणाला, "तुम्हाला माहित नाहीये, तुम्ही काय केलंय...?" त्या माणसानं मला सांगितलं, "आता मी हास्यजत्रेमुळेच जिवंत आहे. बाकी कोणामुळेच नाही. माझी उजवी बाजू पूर्ण पॅरलाईज्ड होती. मी एका जागेवर होतो. मी फक्त हास्यजत्रा बघायचो आणि हसायचो... डॉक्टरांनी कधी बरा होईन हे सांगितलं नव्हतं. औषधं चालू होती. मी समीर दादा आणि विशाखा ताईचं स्किट बघत होतो आणि मला एवढं हसू आलं की, माझ्या आत काय झालं माहीत नाही. पण, मी हसता हसता उठून बसलो आणि त्या आजारातून मी बरा झालो..."
'लाफ्टर इज मेडिसिन' आपण ऐकतो फक्त... : ओंकार राऊत
अर्धांगवायु झालेल्या व्यक्तीचा अनुभव शेअर करताना ओंकार राऊतनं सांगितलं की, "लाफ्टर इज मेडिसिन' आपण ऐकतो फक्त... पण, हे त्याच्यासाठी खरं ठरलं. त्यावेळी मला काही सुचलं नाही..."
मुलाखतीत पुढे बोलताना ओंकार राऊतनं आणखी एक किस्सा शेअर केला. ओंकार राऊत म्हणाला की, "आणखी एक चाहता आलेला. त्याचा घटस्फोट होऊन सहा महिने झालेले. तो जीव देणार होता. पण त्याने हास्यजत्रा पाहिली आणि त्याच्या डोक्यातून आयुष्य संपवण्याचा विचार पूर्णपणे गेला. या सगळ्यामुळे कधीकधी खूप भावूक व्हायला होतं..." तसेच, पुढे बोलताना त्यानं सांगितलं की, आम्ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधले कलाकार अनेकदा परदेशवारी करतो. त्यावेळी येणारे अनुभवही फारच वेगळे असतात. परदेशातील प्रेक्षकांचे अनुभव सांगतात ओंकार राऊत म्हणाला की, "फॉरेन टूर्सलाही गेल्यावर प्रेक्षक म्हणतात, आमची मुलं तुमच्यामुळे मराठी शिकतायत. त्यामुळे आपल्यामुळे कोणाचं चांगलं होतंय, या विचाराने खूप बरं वाटतं..."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
