Nushrratt Bharuccha Clarifies Viral Insta Story: इंडियन प्रीमियर लीग 2026 चा (Indian Premier League 2026) खिताब रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (Royal Challengers Bengaluru) जिंकला आणि देशभरात एकच जल्लोष झाला. 31 मे रोजी रात्री विराट कोहलीच्या (Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं (RCB) IPL 2026 ची ट्रॉफी उंचावली आणि चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सोशल मीडियावर आरसीबीवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. यासोबतच सेलिब्रिटींनीही आरसीबीच्या विजयाचा जल्लोष साजरा केला. अनेकांनी आरसीबी आणि विराट कोहलीसाठी पोस्ट केल्या. तर, अनेकांनी सोशल मीडियावर स्टोरी टाकल्या. पण अभिनेत्री नुसरत भरूचाला (Actress Nushrratt Bharuccha) मात्र आरसीबीसाठी स्टोरी टाकणं चांगलंच महागात पडलंय. या स्टोरीमुळे नुसरत भलतीच ट्रोल झाली. नुसरतच्या स्टोरीमध्ये बॅकग्राउंडला कथितरित्या अश्लील आवाज येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आणि नुसरत भरूचा चर्चेत आली.  आता याच ट्रोलिंगवर अभिनेत्रीनं भाष्य केलं आहे. 

Continues below advertisement

आरसीबी (RCB) जिंकल्यानंतर नुसरत भरूचानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बॅकग्राउंडला काही विचित्र, अश्लील आवाज ऐकू येत होते. नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केल्यानंतर हा व्हिडीओ अभिनेत्रीनं डिलीट करण्यात आल्याचं बोललं जाऊ लागलं, तरी अनेक लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. आता नुसरतनं याबाबत स्पष्टीकरण दिलंय. तिनं सांगितलंय की, त्या स्टोरीच्या बॅकग्राउंडला येणारे आवाज हे तिच्या पाळीव कुत्र्याचे होते. नुसरत भरूचा हिनं नंतर सोशल मीडियावर या परिस्थितीबाबत स्पष्टीकरण दिलंय आणि ही संपूर्ण घटना आणि त्यानंतर झालेलं ट्रोलिंग अत्यंत त्रासदायक असल्याचं म्हटलंय. या गैरसमजामुळे तिला खूप मनस्ताप सहन करावा लागला. 

नुसरतबद्दल पसरवल्या गेलेल्या अफवा (Actress Nushrratt Bharuccha Criticised Inappropriate Sound)

नुसरत भरूचानं नुकतंच हिंदुस्थान टाईम्सशी बोलताना व्हायरल झालेल्या इन्स्टा स्टोरीवर आणि त्यामुळे झालेल्या ट्रोलिंगवर भाष्य केलंय. तसेच, या घटनेचा तिच्यावर आणि तिच्या कुटुंबावर कसा नकारात्मक परिणाम झाला, हे सांगितलं. तिला इंटरनेटवर स्वतःबद्दल काहीही वाचण्याची किंवा पाहण्याची भीती वाटू लागली होती. 

नुसरत भरूचा म्हणाली की, "खरं तर, माझा यावर विश्वासच बसत नव्हता. तो एक अतिशय सामान्य आणि आनंदाचा क्षण होता. मी एका मित्राच्या घरी सामना पाहत होते आणि बॅकग्राउंडला कुठेतरी एका कुत्र्याच्या पिल्लाचा रडण्याचा आवाज येत होता. पण जेव्हा मी पाहिलं की, ही घटना अचानक किती अश्लील आणि विकृत वळणावर गेली, आणि ते किती वेगानं व्हायरल झालं पसरलं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं... जणू काही माझ्यावर हल्लाच झालाय... एखादी खोटी गोष्ट इतक्या वेगानं व्हायरल होताना पाहिल्यावर एक विचित्र प्रकारची लाचारी जाणवली. काय चाललंय हे समजून घेण्याआधीच, ती खोटी गोष्ट स्वतःचंच एक वेगळं रूप धारण करते..."

पुढे बोलताना नुसरत भरूचा हिनं सांगितलं की, सोशल मीडियावर हे प्रकरण इतकं वाढेल याची तिला कल्पनाही नव्हती. तिला या 'ट्रोलिंग'चा खूप मोठा फटका बसला. आपण कधीही न केलेल्या गोष्टीशी आपलं नाव जोडलं गेल्याचं पाहून अभिनेत्रीला खूप दुःख झालं. या परिस्थितीमुळे तिनं काही दिवस आपला फोन पाहणंही बंद केलेलं. मात्र, या कठीण काळात तिला तिच्या मित्र-मैत्रिणींचा आणि कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळाला.

ट्रोलिंगनं त्रस्त झालेल्या नुसरतला कुटुंबाची भक्कम साथ (Nushrratt Bharuccha On Trolling)

नुसरत भरूचानं सांगितलं की, माझ्या घरातले तर माझ्याहीपेक्षा जास्त वैतागले होते. त्यांची प्रॉयॉरिटी मला सांभाळणं हिच होती. त्यांनी मला सांगितलं की, इन्स्टावरुन लॉग ऑफ हो, हे सगळं अजिबात वाचू नकोस... माझा मित्र, ज्याचं घर आणि कुत्र्याच्या पिल्लामुळे हे सर्व सुरू झालेलं, तोसुद्धा यामुळे खूप चिंतेत होता. एवढुशा गोष्टीला लोकांनी किती चुकीच्या पद्धतीनं मोडून-तोडून ठेवलेलं, या विचारानंच तो वैतागलेला. ट्रोलर्सची अजिबात चिंता करायची नाही, हे तो मला वारंवार सांगत होता. जेव्हा बाहेरचा कोलाहल असह्य होतो, तेव्हा हा छोटासा वर्तुळच तुम्हाला खंबीर ठेवतो.  

नुसरत भरुचा असंही म्हणाली की, या घटनेनंतर ती अधिक सावध झालीय. कारण तिची सेलिब्रिटी म्हणून असलेली ओळख तिला कोणत्याही गोष्टीशी, अगदी एखाद्या कुत्र्याच्या पिल्लाच्या रडण्यासारख्या क्षुल्लक गोष्टीशीही, जोडणं सोपं करते. 

नेमकं घडलेलं काय? 

सोशल मीडियावरील काही युजर्सनी असा दावा केलेला की, आरसीबी (RCB) जिंकल्यानंतर नुसरत भरूचानं शेअर केलेल्या एका व्हिडीओ स्टोरीच्या बॅकग्राउंडला काही आक्षेपार्ह, अश्लील आवाज ऐकू येत होते. त्यानंतर या कथित व्हिडीओची क्लिप वेगानं व्हायरल झाली आणि यावर विविध प्रतिक्रिया समोर आल्या. मात्र, हा व्हिडीओ खरोखर नुसरत भरुचा हिनंच शेअर केलाय का? सोशल मीडियावर व्हायरल होणारी स्क्रिन रेकॉर्डिंग नुसरतीचीच आहे का? याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नव्हती. तसेच, त्या व्हिडीओत ब्रॅकग्राउंडला येणाऱ्या आवाजांबाबत केला जाणारा दावा कितपत खरा आहे, याबाबतही कुणालाच काही अधिकृत माहिती नव्हती. पण, आता नुसरत भरूचानं स्वतःच स्पष्टीकरण देऊन सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.