Nora Fatehi Sanjay Dutt Song Trolling: संगीत हा भारतीय संस्कृतीचा महत्त्वाचा भाग मानला जातो. मात्र गेल्या काही वर्षांत काही चित्रपटगीतांमध्ये अश्लील शब्द आणि भडक सादरीकरण वाढल्याची टीका वारंवार होताना दिसते.चित्रपटांमधील गाण्यांमध्ये वाढत्या अश्लीलतेवर पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ती नोरा फतेही आणि संजय दत्त यांच्यावर चित्रित केलेल्या 'सरके चुनर तेरी सरके ' या नव्या गाण्यामुळे. या गाण्यावर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे. हे गाणं आगामी 'केडी द डेव्हिल ' या चित्रपटातील असून त्यातील बोल, नृत्य आणि सादरीकरणावर अनेकांनी अश्लीलतेचे आरोप केले आहेत.

‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्याबाबतही अशीच प्रतिक्रिया उमटली आहे. गाण्याच्या सुरुवातीला वातावरण सामान्य वाटत असलं, तरी पुढे येणाऱ्या काही ओळींमध्ये शब्दांची मर्यादा ओलांडल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.

गाण्यातील स्टेप्सवरही टीका

या गाण्यातील काही नृत्य स्टेप्सही वादाच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. नोरा फतेही हिचे पदर अंगावरून खाली पाडणाऱ्या स्टेप्स आणि संजय दत्तचा हुक स्टेप यावर काही सोशल मीडिया युजर्सनी आक्षेप घेतला आहे. काहींनी तर गाण्यातील सादरीकरण ‘अतिशय भडक’ असल्याची टीका केली आहे. हे गाणं  अर्जून जानया यांनी संगीतबद्ध केलं असून बोल रकीब आलम यांनी लिहिले आहेत. तर हे गाणं गायिका मंगली यांनी गायले आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन प्रेम यांनी केलं आहे. या चित्रपटात ध्रूव सरजा, शिल्पा शेट्टी, व्ही रविचंद्रन, संजय दत्त आणि नोरा फतेही यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

सोशल मीडियावर मिश्र प्रतिक्रिया

गाणं रिलीज होताच ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झालं. काही प्रेक्षकांनी गाण्याची भव्यता आणि नोरा फतेहीच्या डान्सचं कौतुक केलं, तर अनेकांनी गाण्यातील बोल आणि स्टेप्सवर टीका केली. काही युजर्सनी तर या गाण्यामुळे आजच्या संगीताची पातळी घसरत असल्याचंही म्हटलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी बादशहाच्या टिटीरी या गाण्यावरही वाद झाला होता. त्यामुळे चित्रपटसृष्टीतील गाण्यांमधील अश्लीलतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अनेकजण आजही किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांच्या काळातील सुरेल आणि सभ्य गीतांची आठवण काढताना दिसत आहेत.