No Tribute to Dharmendra at Oscars: 15 मार्च रोजी लॉस एंजेलिसमध्ये 98 वा अकादमी पुरस्कार अगदी थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात अनेक चित्रपट आणि कलाकारांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जगभरातील दिग्गज कलाकारांना या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले होते. दरम्यान, भारतीय या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याशी प्रचंड नाराज झाले आहेत. खरंतर 2026 च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात दिवंगत कलाकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली होती. परंतु, या लिस्टमध्ये दिग्गज भारतीय अभिनेते धर्मेंद्र यांचं नाव नव्हते. मात्र, आता या प्रकरणावर धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी आणि मुलगी ईशा देओल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
24 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांना 2026 चा प्रतिष्ठित पद्मविभूषण पुरस्कार (मरणोत्तर) जाहीर करण्यात आला. दरम्यान, 98व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातही त्यांना श्रध्दांजली वाहिली जाईल, अशी अपेक्षा भारतीयांना होती. मात्र, तसं घडलं नाही. या कारणामुळे इंटरनेटवर भारतीयांनी या सोहळ्यावर नाराजी व्यक्त केली. दरम्यान, असंख्य प्रतिक्रिया उमटत असताना, धर्मेंद्र यांची पत्नी हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
या प्रकरणाबाबत मुलाखतीत हेमा मालिनी म्हणाल्या, 'ही खरंच एक लाजिरवाणी गोष्ट आहे. जगभरातील असंख्य लोकांवर ज्याचा प्रभाव आहे, त्या अभिनेत्याला दुर्लक्षित करणं खरंच लज्जास्पद गोष्ट आहे. धर्मेंद्र हे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे कलाकार आहेत. त्यांना कारकिर्दीत बरेच पुरस्कार मिळाले नाही. मग त्यांनी ऑस्कर पुरस्काराची पर्वा का करावी? आम्हाला भारतीयांकडून इतकं प्रेम मिळतंय याचा आम्हा दोघांना आनंद आहे. मात्र, पुरस्कार नेहमीच त्यांच्यापासून दूर राहिले आहे', अशी भावना हेमा मालिनी यांनी व्यक्त केली.
धर्मेंद्र यांची मुलगी ईशा देओल हिनं देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, 'मला नाही वाटत नाही की त्यांना कोणताही फरक पडला असता. त्यांचं मन आणि ह्रदय खूप मोठे आहे. ते अशा गोष्टींची चिंता करत नाहीत, पर्वा करत नाहीत. त्यांच्यासाठी आयुष्य हे कधीही नाव किंवा प्रसिद्धी, प्रतिष्ठेपुरते मर्यादित राहिले नाही. तर, प्रेम, दयाळूपणा आणि प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्याबद्दल होते', असं अभिनेत्री म्हणाली.
