मुंबई : बातमीचं शीर्षक वाचून धक्का बसला का? अर्थात धक्कादायकच असा हा मथळा आहे. होय, राज्य सरकारने चित्रिकरणाला सशर्त परवानगी दिली असली तरी अमिताभ बच्चन यांना तूर्त चित्रिकरण करता येणार नाही. कौन बनेगा करोडपतीचे सध्या प्रोमो टीव्हीवर येतायत. अमिताभ बच्चन यांनी घरातून हे प्रोमो शूट केले आणि ते टीव्हीवर चालले. राज्य सरकारने चित्रिकरणाला परवानगी दिल्यानंतर कौन बनेगा करोडपती सह अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या. पण या नियम अटींमधल्या एका अटीने मात्र अमिताभ बच्चन यांची गोची केली आहे. म्हणूनच चित्रिकरण करायचं असेल तर बच्चन साहेबांना अजून किमान दोन महिने थांबावं लागणार आहे.

झालंय असं की राज्य सरकारने ज्या नियम अटी घालून दिल्यात त्यात सर्वांसाठीचे नियम आहेत. म्हणजे सर्व विभागांसाठीचे. त्यातल्या सेट आणि लोकेशनबद्दलच्या तिसऱ्या  मुद्द्यातल्या  16 व्या नियमाने अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ कलाकार, दिग्दर्शक, लेखक, तंत्रज्ञांना चित्रिकरणापासून दूर राहायला सांगितलं आहे. कारण हा नियम सांगतो, 65 वर्षावरचे कोणीही तंत्रज्ञ, कलाकार यांना सेटवर मज्जाव असणार आहे. कोरोनाचा संसर्ग ज्येष्ठ व्यक्तींना होण्याचं प्रमाण जास्त आहे. हे लक्षात घेऊन हा नियम बनवण्यात आला आहे. त्याचमुळे अमिताभ बच्चन यांना कौन बनेगा करोडपतीचे चित्रिकरण सध्या करता येणार नाही. केवळ अमिताभ बच्चन नव्हे, तर अमिताभ बच्चन, अनुपम खेर, अन्नू कपूर, नसिरूद्दीन शाह, धर्मेंद्र, शक्ती कपूर, मिथून, पंकज कपूर, जॅकी श्रॉफ, डॅनी, दिलीप ताहिल, राकेश बेदी, कबीर बेदी या कलाकारांना चित्रिकरणापासून वंचित राहावं लागेल.

हिंदीसोबत मराठी कलाकारांचाही यात समावेश आहे. यात समावेश होतो दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रवी पटवर्धन, अरूण नलावडे, शिवाजी साटम, सतीश आळेकर आदी मान्यवरांचा. अर्थात ही बात केवळ कलाकारांची नाही. तर यात दिग्दर्शक, लेखकही समील आहेत,. दिग्दर्शक डेव्हिड धवन, अनिल शर्मा, सुभाष घई, महेश भट्ट, मणिरत्नम, प्रकाश झा, श्याम बेनेगल, विधूविनोद चोप्रा, प्रियदर्शन, गुलजार, शेखर कपूर, जावेद अख्तर आदींना चित्रिकरण करता येणारं नाही.

नियमाचा फेरविचार करण्याची विनंती

या एका नियमाचा फेरविचार करा अशा आशयाचं पत्र हिंदीतल्या दिग्दर्शकांच्या असोसिएशनने दिलं आहे. तर मराठी चित्रपट महामंडळामध्येही याबाबत लवकरच बैठक होणार आहे. हे नियम कलाकारांच्या काळजीपोटीच घेण्यात आले असून, आणखी थोडे दिवस थांबायला हरकत नाही असं काहींचं म्हणणं आहे. तर जे मोठे कलाकार अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये आहेत त्यांच्याबद्दल काही निर्णय घेता येतो का यावर चित्रपट महामंडळाच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

थोडी वाट पाहावी..

सर्व नियम कलाकारांच्या काळजीपोटीच घेण्यात आले आहेत. 65 वर्षावरची अट ही केंद्राचीच आहे कारण, आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सिनिअर सिटीझन्स हे कोरोनासाठी हायरिस्कवर असतात. त्यामुळेच हा नियम केला आहे. शिवाय प्रश्न फक्त पुढच्या काही महिन्यांचा आहे. त्यामुळे सर्वांनीच धीरान ं घ्यायला हरकत नाही, असं मत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या एका कर्मचाऱ्याने नोंदवलं.