Nitesh Rane on AR Rehman: संगीतकार ए .आर, रहमान काही दिवसांपूर्वी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमुळे चर्चेत आले होते. हिंदी चित्रपटसृष्टीत गेल्या आठ वर्षात 'पॉवर शिफ्ट' आणि 'सांप्रदायिक राजकारणामुळे' आपलं काम कमी झाल्याचा दावा त्यांनी केला होता. शिवाय 'छावा' चित्रपट फूट पडणारा असल्याचेही ते म्हणाले होते. या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालेला. त्यानंतर 'कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता' असं सांगत रहमान यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. ए. आर. रहमान यांच्या वक्तव्यावरून संपूर्ण मनोरंजन विश्वातून प्रतिक्रिया उमटत असताना आता महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी ट्विट करत ए. आर. रहमान यांच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मधील उपस्थितीवरून नाराजी व्यक्त केली आहे. रहमान यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचा निषेधही त्यांनी केलाय.
दरम्यान 30 जानेवारी रोजी किशोर बेलेकर दिग्दर्शित 'गांधी टॉक्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला. ए आर रहमान यांचा संगीत असणारा हा सिनेमा एक मूकपट आहे. कोणताही संवाद नसल्यामुळे या चित्रपटातील संगीत हा या चित्रपटाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे सिनेमाच्या प्रमोशन करता ए आर रहमान अलीकडेच 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये पोहोचले होते. मात्र, कपिल शर्माच्या शो मधील रहमान यांचा उपस्थितीमुळे राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी ए आर रहमान यांच्यावर आक्षेप घेतला आहे.
काय म्हणाले नितेश राणे?
कॉमेडी म्हटलं की कपिल शर्माचं नाव आपोआप पुढे येतं आणि The Great Indian Kapil Show ला देश-विदेशात मोठी लोकप्रियता मिळाली आहे. मात्र, ए. आर. रहमान यांच्या काही वादग्रस्त विधानांमुळे भारत, इतिहास आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांना इतक्या मोठ्या मंचावर स्थान देण्याच्या निर्णयाचा आम्ही तीव्र निषेध करतो.
मनोरंजनाची स्वातंत्र्य मान्य आहे, मात्र जनभावना, हिंदू समाजाच्या भावना आणि राष्ट्रीय एकतेला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. Netflix आणि शोच्या निर्मात्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि सामाजिक संवेदनशीलतेचा सन्मान ठेवावा, अशी अपेक्षा आहे. कॉमेडीचे स्वागत आहे, पण भारताची अखंडता, सांस्कृतिक अस्मिता आणि हिंदुत्वाशी कोणताही तडजोड मान्य नाही.
ए आर रहमान काय म्हणाले होते?
“गेल्या 8 वर्षांत सत्तेत बदल झाला असावा. जे फारसे क्रिएटिव नाहीत, तेच निर्णय घेत आहेत. कदाचित सांप्रदायिक बाबीही असतील, पण कोणी माझ्या समोर उघडपणे काही सांगितलेलं नाही. मात्र काही कुजबुज ऐकू येते,” असं रहमान यांनी म्हटलं होतं.
