Marathi Movie Nipun Dharmadhikari Vaidehi Parashurami : अभिनेता-दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी (Nipun Dharmadhikari) आणि अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) यांची ऑन स्क्रिन केमिस्ट्री प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या दोघांची मुख्य भूमिका असलेला "एक दोन तीन चार" या चित्रपटाचा टीझर आऊट झाला असून रिलीज डेटही जाहीर करण्यात आली आहे. वरुण नार्वेकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. वरुण नार्वेकरने मुरांबा या चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवले होते. 


अनपेक्षित सरप्राईज हे नेहमीच धक्का देवून जाते. हा धक्का आनंदाचा की चिंता वाढवणारा हे त्या-त्या परिस्थितीनुसार ठरत असते. समीर आणि सायली यांच्या  क्युट लवस्टोरीत एक मोठ्ठा बॉम्ब फुटलाय आणि या जोडप्याच्या आयुष्यात आता मोठा ट्विस्ट आला आहे. सम्या आणि सायली या दोघांच्या आयुष्यात आता चिमुकल्या पावलांनी तिसरी व्यक्ती येणार आहे. या तरुण दाम्पत्याला ही ही जबाबदारी सांभाळता येईल का याचीही चिंता घरातील मंडळींना आहे. तर, दुसरीकडे हे दोघेही आईबाबा होणार असल्याचा आनंदही कुटुंबातील सदस्यांना होतो. आता सायलीच्या गरोदरपणाची आलेली ही जबाबदारी सम्या कशी पार पाडणार, कुटुंबातील लोकांच्या अपेक्षांची पूर्तता करणार, सम्या-सायलीच्या आयुष्यात आणखी काही बदल होणार का, या सगळ्या भोवती चित्रपटाचे कथानक असणार आहे.


चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदियाळी... 


या चित्रपटात दिग्गज कलाकारांची मांदियाळी झळकणार आहे. सायलीची भूमिका वैदेही परशुरामी साकारणार आहे. तर, समीरच्या भूमिकेत निपुण धर्माधिकारी असणार आहे. त्याशिवाय, ज्येष्ठ अभिनेते सतीश आळेकर,  अभिनेत्री मृणाल कुलकर्णी,  ऋषिकेश जोशी, शैला घाणेकर आदी कलाकरांच्या भूमिका आहेत. त्याशिवाय, ‘फोकस इंडियन‘ या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया इन्फ्लुन्सर ‘करण सोनावणे‘ सुद्धा चित्रपटात झळकणार आहे. 


कधी होणार रिलीज? 


हा चित्रपट याआधी  जानेवारी महिन्यात  रिलीज होणार होता. मात्र, काही कारणांनी रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती. आता हा चित्रपट पुढील महिन्यात 19 जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


जिओ स्टुडिओज या चित्रपटाची प्रस्तुती करणार आहे. तर, ज्योती देशपांडे, रणजित गुगळे, केयूर गोडसे, निपुण धर्माधिकारी आणि नीरज बिनीवाले यांनी निर्मिती केली आहे.  बहावा एन्टरटेन्मेंट आणि 16 बाय 64 यांच्या साहाय्याने "एक दोन तीन चार" चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.