Nikhil Chavan-Anushka Sarkate Kelvan: मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय जोडी निखिल चव्हाण (Nikhil Chavan) आणि अनुष्का सरकटे (Anushka Sarkate) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाच्या तयारीला वेग आला असतानाच त्यांच्या लग्नपूर्व सोहळ्यांनाही सुरुवात झाली आहे. नुकतेच या दोघांसाठी खास पारंपरिक केळवणाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात आनंद, कौटुंबिक जिव्हाळा आणि मराठमोळ्या परंपरांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.
या खास कार्यक्रमाला अभिनेते भरत जाधव, सुधीर निंबाळकर, कमलाकर सातपुते, अभिनेत्री शर्मिला शिंदे यांच्यासह अनेक कलाकार आणि कुटुंबीय उपस्थित होते. सर्वांनी निखिल आणि अनुष्काचे औक्षण करत त्यांच्या आगामी आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
दोघांच्या भन्नाट उखाण्यांनी पिकला हशा
या कार्यक्रमातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले ते दोघांचे भन्नाट उखाणे. अनुष्काने उखाणा घेताना, "लग्नसराई सुरू झाली, लवकरच दारी येणार निखिलची वरात... 'तू तू मी मी'चे पुढील प्रयोग आता होणार आमच्याच घरात," असे म्हणत सर्वांची मने जिंकली. त्यानंतर निखिलनेही आपल्या खास विनोदी अंदाजात, "भरत सरांना सांगितलं मी लग्न करतोय, तर ते म्हणाले 'सही रे सही'... अनुष्का, वचन देतो तुला कधी होणार नाही 'तू तू मी मी'," असा उखाणा घेताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या गोड क्षणांनी रंगलेल्या केळवण सोहळ्याने निखिल आणि अनुष्काच्या लग्नाची उत्सुकता आणखी वाढवली आहे. आता चाहत्यांचे लक्ष त्यांच्या लग्नसोहळ्याकडे लागले आहे.
खऱ्या आयुष्यातही कारभारी लयभारी
'कारभारी लयभारी' मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ही जोडी आता रिअल लाईफमध्येही नव्या नात्याची सुरुवात करणार आहे. त्यामुळे त्यांच्या लग्नसोहळ्याबाबत चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता आहे. केळवणाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच त्यावर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
गेल्या अनेक महिन्यांपासून निखिल अनुष्का एकमेकांना डेट करत होते. अखेर दोघांनीही सोशल मीडियावरून नात्याची कबुली दिली. दोघांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
