Netflix Trending Web Series: ओटीटीवर सध्या एक वेब सिरीज जबरदस्त चर्चेत आली आहे. भारतात ट्रेंड होणारी ही सिरीज इतकी सस्पेन्सने भरली आहे की शेवटपर्यंत खरा व्हिलन कोण आहे हे समजतच नाही. 8 भागांची ही सिरीज प्रेक्षकांना पहिल्या एपिसोडपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते.
“सत्य हे प्रकाशासारखं असतं, ज्यामुळे डोळे दिपून जातात. पण खोटं हे सुंदर संध्याकाळीसारखं असतं, ज्याच्या प्रकाशात सगळं चमकतं… जोपर्यंत ते खोटं उघड होत नाही,” असा संवाद या सिरीजचा सस्पेन्स आणि थरार नेमका पकडतो.
भारतात ट्रेंडिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
द आर्ट ऑफ सारा ही वेब सिरीज गेल्या महिन्यात Netflix वर रिलीज झाली आणि तेव्हापासून ती सतत टॉप 10 ट्रेंडिंगमध्ये आहे. सध्या भारतात ही सिरीज दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. ही कोरियन थ्रिलर सिरीज पूर्णपणे मिस्ट्री आणि थरारावर आधारित आहे. यात ना रोमॅन्स आहे ना कॉमेडी; केवळ गुन्हा, रहस्य आणि मानसिक खेळ यावरच संपूर्ण कथा उभी आहे.
काय आहे ‘द आर्ट ऑफ सारा’ची कथा?
या सिरीजची सुरुवात एका खून प्रकरणाने होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या गटाराखाली एक मृतदेह सापडतो. त्या मृतदेहाचा चेहरा इतका विद्रूप झालेला असतो की ओळख पटत नाही. मात्र पायावर असलेल्या टॅटूमुळे ती व्यक्ती सारा किम असल्याचं समोर येतं. त्यानंतर सुरू होते एक गुंतागुंतीची चौकशी. सारा किम नेमकी कोण होती? तिच्यावर इतकी क्रूर मारहाण कोणी केली? आणि तिला थंडीत मरायला गटारात का टाकलं?
जसे-जसे एपिसोड पुढे जातात तसे अनेक गुपितांचा थरार उलगडत जातात. तपास करताना एका डिटेक्टिव्हला कळतं की सारा किमची खरी ओळख काहीतरी वेगळीच आहे. ही कथा हाय-फॅशन, फसवणूक आणि रहस्यांनी भरलेल्या जगात पुढे सरकत जाते.
क्लायमॅक्सने वाढवली सीझन 2 ची उत्सुकता
या सिरीजचा क्लायमॅक्स प्रेक्षकांना अक्षरशः धक्का देणारा आहे. शेवटच्या भागात सारा किम म्हणते की ती खरी सारा नसून तिने ज्याला मारलं तीच खरी सारा आहे. मात्र त्यामागची खरी गोष्ट अजूनही गूढच राहते.यामुळेच 7.3 IMDb रेटिंग मिळालेल्या या सिरीजचा दुसरा सीझन येईल अशी चाहत्यांना आशा आहे.
या सिरीजमध्ये शिन-हे-सून हिने सारा किमची भूमिका साकारली आहे, तर ली जून-ह्यूक डिटेक्टिव्ह पार्क मू-ग्योंगच्या भूमिकेत दिसतो. याशिवाय किम जी वोन, जंग- दा - बिन, जंग- जिन - यंग आणि अरिया साँग यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.जर तुम्हाला थरार, रहस्य आणि अनपेक्षित ट्विस्ट असलेल्या कथा आवडत असतील, तर ही सिरीज नक्कीच ‘मस्ट वॉच’ ठरू शकते.
