Neem Karoli Baba Biopic: 'नीम करोली बाबा' (Neem Karoli Baba) यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या आगामी सिनेमाचं पहिलं पोस्टर लखनौ इथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात जाहीर करण्यात आलं. यावेळी सिनेमाची संपूर्ण टीम,  उत्तर प्रदेश सरकारचे पर्यटन आणि संस्कृती मंत्री जयवीर सिंह आणि चित्रपट निर्माते मधुर भांडारकर उपस्थित होते. आगामी सिनेमाचं नाव 'श्री बाबा नीब करोरी महाराज' (Shree Baba Neeb Karori Maharaj) असं असणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या सिनेमात मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे (Subodh Bhave) या सिनेमात 'नीम करोली बाबा' यांच्या भूमिकेत दिसणार आहे.  

सुबोध भावे नेमकं काय म्हणाला?

सुबोध भावेनं सिनेमाचं पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलं आहे. तसेच, शेअर करताना लिहिलं आहे की, "नीम करोली बाबांच्या आशीर्वादाने, आज माझ्या चित्रपटाचे पोस्टर लाँच लखनौमध्ये पार पडले. हा क्षण माझ्यासाठी खूप खास आणि अविस्मरणीय आहे. तुमच्या प्रेमामुळे आणि आशीर्वादामुळे हा प्रवास शक्य झाला. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण आमच्या चित्रपटाचा तितकाच आनंद घ्याल, जितक्या आवडीने आणि खरेपणाने आम्ही हा सिनेमा बनवला आहे..."

"बाबांची भूमिका साकारण्याचे भाग्य मला लाभले. लवकरच हा चित्रपट रसिकांसमोर येईल. जय श्रीराम! जय हनुमान!", असंही सुबोध भावेनं म्हटलं आहे. 

सिनेमा कधी प्रदर्शित होणार? 

'नीम करोली बाबा' यांच्या जीवनावर आधारित सिनेमा कधी रिलीज केला जाईल, कोणत्या प्लॅटफॉर्मवर केला जाईल, याबाबत अद्याप कोणताही तपशील समोर आलेला नाही. सुबोधसोबत या सिनेमात समीक्षा भटनागर, पंकज विष्णू, स्मिता तांबे, हितेन तेजवानी, राजेश शर्मा, मिलिंद गुणाजी, वर्षा माणिकचंद, अनिरुद्ध दवे, हेमंत पांडे, लावण्या सिंग, अविनाश वाधवान हे कलाकार झळकणार आहेत.

दरम्यान, 'नीम करोली बाबा' हे गेल्या शतकातील सर्वात प्रभावशाली संतांपैकी एक मानले जातात. उत्तराखंडमधील कैंची धाम हे त्यांचं प्रमुख आश्रम असून आजही लाखो भाविक तिथे दर्शनासाठी जातात. बाबांनी त्यांच्या आयुष्यात जवळपास 108 हनुमान मंदिरं बांधली. तसेच, त्यांनी आपलं अख्खं आयुष्य अत्यंत साधेपणानं जगले. तसेच, संपूर्ण आयुष्यात त्यांनी लोकांना अध्यात्माचा संदेश दिला. हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींसुद्धा बाबा नीम करोलींचे भक्त आहेत. अशातच मराठी मनोरंजनविश्वातील प्रेक्षकांचा लाडका आणि सुप्रसिद्ध अभिनेता त्यांची भूमिका साकारणार असल्यामुळे या सिनेमाची सर्वांना उत्सुकता लागली आहे. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Anya Singh On Aryan Khan Baads Of Bollywood Series: आर्यन खान नाहीतर, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'चं दिग्दर्शन कुणी केलंय? अभिनेत्रीनं सगळंच सांगून टाकलं...