Nawazuddin Siddiqui : 'अभ्यासू अभिनेता' अशी ओळख असलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui) आपल्या अभिनयाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विविधांगी भूमिका साकारत त्याने स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आता 'ठाकरे' (Thackeray) सिनेमानंतर पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत काम करण्यासाठी नवाज सज्ज आहे. 


नवाजचा हिंदीसह मराठीतदेखील मोठा चाहतावर्ग आहे. अशातच आता मराठीत ट्वीट करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याने लिहिलं आहे,"मराठी भाषा दिवस साजरा करण्याची सुरुवात झाली आहे. मराठी नाटक, मराठी सिनेमा आणि महाराष्ट्राच्या लोककला यांचा मी चाहता आहेच... सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!! लवकरच अभिजित पानसेयांच्यासोबत काहीतरी इंटरेस्टिंग येणार आहे. जय महाराष्ट्र". 






नवाजच्या या ट्वीटवर जय महाराष्ट्र नवाज भाई, नव्या चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा, आतुरता, अशा जय महाराष्ट्र जय मराठी, रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा तुम्हाला पाहायला आम्ही उत्सुक आहोत, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. नवाजचं हे मराठी ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलचं व्हायरल होत आहे. नवाज आणि अभिजित पानसे (Abhijit Panse) ही जोडी असल्याने 'ठाकरे 2' प्रेक्षकांच्या भेटीला येणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.


'ठाकरे' सिनेमानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी पुन्हा एकदा मराठी सिनेसृष्टीत गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी मराठी सिनेमाचं नाव 'कलावती' (Kalaawati) असू शकतं. या सिनेमात नवाजसह अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरीश दुधाडे, ओंकार भोजने, दिप्ती धोत्रे, जय दुधाणे आणि नील सालेकर हे कलाकरदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसू शकतात. तसेच संजय जाधव या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार असून अभिजित पानसे या सिनेमाची निर्मिती करतील. 


नवाजुद्दीन सिद्दीकी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत!


नवाजुद्दीन सिद्दीकीची गणना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते. 'ठाकरे', 'बजरंगी भाईजान', 'गॅंग्स ऑफ वासेपूर' यांसारख्या सिनेमात नवाजने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. दरम्यान नवाज सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. पत्नी आलियाने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. 


संबंधित बातम्या


Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल; आलियाने व्हिडीओ शेअर करत केले गंभीर आरोप