Navri Mile Hitlerla Fame Actress: सध्या झी मराठीवरच्या (Zee Marathi) 'नवरी मिळे हिटलरला' (Navri Mile Hitlerla) या मालिकेला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. अशातच मालिकेत जहागीरदारांच्या मोठ्या सुनेची म्हणजेच, दुर्गाची भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे (Sharmila Shinde) नेहमीच चर्चेत असते. अशातच आता अभिनेत्रीनं चाहत्यांसोबत एक गूड न्यूज शेअर केली आहे. शर्मिला 'नवरी मिळे हिटलरला' मालिका करता करता व्यावसायिक नाटकांमध्येही काम करते. सध्या तिचं 'ज्याची त्याची लव्हस्टोरी' हे नाटक रंगभूमीवर गाजत आहे. या नाटकात तिनं 'आरती' ही भूमिका साकारली आहे. याच भूमिकेसाठी अभिनेत्रीला पारितोषिक मिळालं आहे.
शर्मिलाचा महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत 'उत्कृष्ट अभिनय- स्त्री कलाकार' या विभागात सन्मान करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनानं 35 व्या मराठी व्यावसायिक राज्य नाट्य स्पर्धेचे निकाल नुकतेच जाहीर केले आहेत. यंदा या स्पर्धेत अमृता सुभाषच्या 'असेन मी.. नसेन मी...' या नाटकानं पहिला क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत अनेक मराठी कलाकारांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यापैकीच एक शर्मिला शिंदेसुद्धा आहे. शर्मिलानं ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिला पुरस्कार जाहीर झाल्याची माहिती शर्मिलानं इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन दिली.
आशीर्वाद आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं : शर्मिला शिंदे
शर्मिला शिंदेनं यासंदर्भात सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. इन्स्टाग्रावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये शर्मिला म्हणाली की, "ऑस्करपेक्षा राष्ट्रीय पुरस्कार, राज्य शासनाचे पुरस्कार हे मला नेहमीच खूप मोठे वाटतात. म्हणूनच मला तुम्हाला सांगताना खूप आनंद होत आहे की, 35व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीचा निकाल जाहीर झाला असून, माझं नाटक 'ज्याची त्याची लव स्टोरी' यासाठी माझी निवड झाली आहे. हा शासनाचा माझा पहिलाच पुरस्कार असून तुमचं माझ्यावरचं प्रेम, आशीर्वाद आणि विश्वासामुळेच हे शक्य झालं आहे. खूप खूप आभार..."
दरम्यान, शर्मिलाच्या पोस्टवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे. तसेच, तिच्यासोबतच्या सहकलाकारांनी आणि इतर सेलिब्रिटी मित्र-मैत्रिणींही शर्मिलावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, तिला शुभेच्छाही दिल्या आहेत.