Natamastak Marathi movie: नवनवीन विषयांवर आधारित, विचारप्रवर्तक आणि प्रयोगशील चित्रपटांची समृद्ध परंपरा लाभलेल्या मराठी चित्रपटसृष्टीत आणखी एका सामाजिक विषयाला स्पर्श करणारा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. समाजाचे वास्तव प्रतिबिंबित करणाऱ्या, लोकांना विचार करायला प्रवृत्त करणाऱ्या चित्रपटांना नेहमीच रसिकांचा प्रतिसाद लाभला आहे. या परंपरेला पुढे नेत, नुकताच जाहीर झालेला ‘नतमस्तक’ हा चित्रपटही समाजाभिमुख दृष्टिकोनातून तयार करण्यात आला असून, त्याच्या आकर्षक पोस्टरमुळे प्रेक्षकांच्या उत्सुकतेला उधाण आले आहे.(Marathi movie)
आर. एस. गोल्डन ग्रुप मुव्ही मेकर्स या बॅनरखाली निर्माते रमेश वामनराव शिंदे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रमेश शिंदे यांचा हा पहिलाच चित्रपट निर्मितीचा प्रयत्न असला, तरी ते पुण्यातील यशस्वी उद्योजक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जातात. या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे. त्यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या ‘रुपया’ या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता, तसेच ‘घुमा’या त्यांच्या चित्रपटाने महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार पटकावला आहे. ललित प्रभाकर अभिनीत ‘टर्री’ या चर्चित मराठी चित्रपटानंतर महेश काळे पुन्हा एकदा वेगळ्या आशयावर आधारित ‘नतमस्तक’ घेऊन येत आहेत.
कधी प्रदर्शित होणार चित्रपट ?
या चित्रपटाची अधिकृत घोषणा पहिल्या पोस्टर लाँचद्वारे करण्यात आली आहे. पोस्टरवर दुष्काळग्रस्त प्रदेशातील भेगाळलेले शेत, त्यातील विहिरीत पेटलेली आग आणि त्या दिशेने चालत जाणारी एक तरुणी असे दृश्य दिसते. तिच्या शेजारी उभी असलेली गाय या चित्राला अधिक वेधक रूप देते. हे चित्र महाराष्ट्रातील वास्तवाची झलक दाखविणारे असून, प्रेक्षकांना विचारात टाकणारे आहे. चित्रपट पुढील वर्षी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
वास्तववादी कथानक, दिग्दर्शक म्हणाले ..
दिग्दर्शक महेश काळे यांनी सांगितले की, ‘नतमस्तक’ चे पोस्टर हे केवळ आकर्षक नाही, तर भयाण सत्याचे दर्शन घडवणारे आहे. हे दृश्य काल्पनिक नसून वास्तवावर आधारित आहे, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, सध्या चित्रपटाच्या कथानकाचा तपशील गुप्त ठेवण्यात आला असला, तरी लवकरच तो आणि कलाकारांची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली जातील. हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित चित्रपट नसून, सामाजिक जागरूकता निर्माण करून समाजाला नवी दिशा देण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तसेच निर्माते रमेश शिंदे यांच्या पाठिंब्यामुळेच असा विषय मांडणे शक्य झाले, असेही त्यांनी नमूद केले.
सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकणारा प्रयोग
सामाजिक जाणिवेतून साकार होत असलेला ‘नतमस्तक’ हा चित्रपट स्त्री सबलीकरण, युवकांना उद्योग-प्रेरणा, व्यवसाय जागृती, प्राणीमुक्ती, गोशाळा उपक्रम, अनाथ बालकांना मदत आणि शैक्षणिक क्षेत्रात योगदान अशा विविध सामाजिक पैलूंवर प्रकाश टाकतो. समाजसेवक म्हणून रमेश शिंदे यांनी आपल्या उद्योग क्षेत्रातील अनुभवातून समाजासाठी काहीतरी देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यातूनच ‘नतमस्तक’सारख्या चित्रपटाचा जन्म झाला.
समाजातील वास्तवावर प्रामाणिक भाष्य करणारा, संवेदनशील आणि विचारप्रवर्तक असा हा चित्रपट प्रेक्षकांना लवकरच भेटणार आहे आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक अर्थपूर्ण पाऊल ठरणार आहे.